फराह खान दिग्दर्शित ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटाने तिकीटबारीवर ३५० कोटी रुपयांची कमाई केली. फराहच्या दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीतील हा तिसरा यशस्वी चित्रपट ठरला आहे. पण ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटाने केवळ पैसे नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्याला नावलौकिक मिळवून दिला आहे, असे फराहने ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. मोरोक्कोतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापासून ते दुबईतील पुरस्कार सोहळ्यापर्यंत जगभर या चित्रपटाचे यश साजरे करणाऱ्या फराह खानला यंदा ‘लंडन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘मास्टर क्लास’ घेण्याचा मान मिळाला आहे.
‘लंडन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त चित्रपटांच्या निमित्ताने आजवर भेट झाली असेल. मात्र, हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणून तिथे जाऊन ‘मास्टर क्लास’मध्ये जगभरातील नामवंत चित्रपटकर्मीबरोबर संवाद साधण्याची मिळणारी संधी आपल्यासाठी फार महत्त्वाची असल्याचे फराहने सांगितले. ‘हॅप्पी न्यू इअर’ हा फराहचा शाहरुखबरोबर तिसरा यशस्वी चित्रपट आहे. याआधी या दोघांनी ‘ओम शांति ओम’ आणि ‘मैं हू ना’ हे दोन चित्रपट केले होते. शाहरुखबरोबर आता चांगली मैत्री झाली आहे. त्याच्याबरोबर पुन्हा पुन्हा काम करण्याची संधी मिळणे खरोखर कठीण असते. आतापर्यंतच्या यशामुळे ही संधी पुढेही टिकून राहील, याबद्दल आपल्याला जास्त आनंद झाला असल्याचे सांगितले. ३५० कोटींची विक्रमी कमाई, दुबई चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला मिळालेला सवरेत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, मोरोक्कोमध्ये हा चित्रपट तेथील प्रसिद्ध जेम्मा एल ना स्क्वेअर येथे सर्व लोकांसमोर प्रदर्शित करण्याचा मिळालेला सन्मान आणि चित्रपटाची पटकथा ‘ऑस्कर’च्या ग्रंथालयात ठेवली गेली, अशा कित्येक चांगल्या गोष्टी या चित्रपटाच्या यशामुळे घडल्या असल्याचे फराहने सांगितले.
‘हॅप्पी न्यू इअर’नंतर शाहरुख सध्या त्याच्या दोन चित्रपटांवर काम करत आहे. त्यामुळे लगेच त्याच्याबरोबर नवीन चित्रपट जमवणे शक्य नाही. पण ‘हॅप्पी न्यू इअर’ला मिळालेले यश पाहून त्याचा सिक्वल करण्याचा आग्रह निर्मात्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वानीच धरला आहे. अभिषेक बच्चनने साकारलेल्या नंदू भिडेला खास पसंतीची पावती मिळाली असल्याने अभिषेकही सिक्वलसाठी आग्रही असल्याचे फराहने सांगितले. सध्या तरी ‘लंडन’चा मास्टरक्लास, टीव्हीवरचे रिअ‍ॅलिटी शो, थोडी विश्रांती आणि मग सिक्वलची तयारी कदाचित सुरू होईल, असेही फराहने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा