‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटामध्ये फरहान अख्तरने साकारलेली माझी व्यक्तिरेखा हे माझेच प्रतिरुप असल्याचे महान धावपटू मिल्खा सिंग यांनी म्हटले आहे. चित्रपट पाहिल्यावर डोळ्यांत आनंदाश्रू आल्याचे त्यांनी सांगितले. लंडन येथे शुक्रवारी सायंकाळी चित्रपटाचे भव्य प्रदर्शन करण्यात आले होते. त्यावेळी मिल्खा म्हणाले, “फरहानने चित्रपटात खूप चांगली भूमिका केली असून तो माझेच प्रतिरुप आहे. एथलेटिक्स क्षेत्रात भारताची घसरण होत आहे. याच कारणामुळे एथलेटिक्स क्षेत्रातील माझी मेहनत आणि योगदानाची कथा पुढील पिढीला कळणे गरजेचे असल्याचे मला जाणवले. रोम ऑलिम्पिकमध्ये माझ्याकडून निसटलेले सुवर्ण पदक माझ्या हयातीत भावी पिढीने जिंकावे, अशी मला आशा आहे.” मिल्खा सिंग हे फरहान अख्तर, सोनम कपूर, दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा आणि लेखक प्रसून जोशी यांच्यासमवेत रेड कार्पेटवर उपस्थित होते.
फरहानने मिल्खा यांची भूमिका साकारण्यासाठी अनेक महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. ‘भाग मिल्खा भाग’ जगभरात १२ जुलैला प्रदर्शित होत आहे.

Story img Loader