लग्न या विषयावर सध्या मराठीत बरेच चित्रपट, मालिकांची चलती सुरू आहे. तरुणाईमध्ये लग्नसंस्था, आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देणे, मैत्री-लग्न-प्रेमविवाह-नातेसंबंध या गोष्टींनी भारतीय चित्रपटांना नेहमीच मसाला पुरविला आहे. आता मराठीबरोबरच हिंदीमध्येही अधूनमधून या विषयावर चित्रपट येतच असतात. २००६ साली मल्लिका शेरावत-राहुल बोस ही एकदम अजबगजब जोडी सादर करून दिग्दर्शक साकेत चौधरीने ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ हा चित्रपट केला होता. उत्कृष्ट लेखनामुळे हा चित्रपट चांगला गाजला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल ‘शादी के साइड इफेक्ट्स’ पुढील वर्षांत येणार असून साकेत चौधरीने विद्या बालन आणि फरहान अख्तर ही जोडी त्यात घेतली आहे. ‘मिल्खासिंग..’ मुळे फरहानची अभिनेता म्हणून वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. तर ‘डर्टी पिक्चर’ आणि त्यानंतरच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे विद्या बालनचीही वेगळी प्रतिमा आहे. अशा वेळी ही अजब-गजब जोडी पडद्यावर आणायचे साकेत चौधरीने ठरविले आहे. नुकताच या नव्या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
फरहान-विद्या यांच्या या अनोख्या जोडीची ‘केमिस्ट्री’ पडद्यावर पाहायला लोकांना आवडेल का हा प्रश्न पुढील वर्षीच्या व्हॅलेण्टाईन डेपर्यंत गुलदस्त्यात राहणार आहे. परंतु, मुख्य प्रवाहातील बिग बजेट नायककेंद्री सिनेमांच्यापेक्षा वेगळ्या विषयावरील चित्रपटांमध्ये अलिकडे नवनवीन कलावंत, जुने-नवे, बडे-छोटे कलावंत अशा जोडय़ा एकत्र येताना दिसत आहेत. त्यातच व्हॅलेण्टाईन डेच्या आसपास चित्रपट प्रदर्शित होत असल्याने लग्नानंतरचे प्रेम हा लग्न झालेल्या प्रेक्षकांनाही आकर्षित करणारा विषय असल्यामुळेही ‘शादी के साइड इफेक्ट्स’ या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सिक्वेल असल्यामुळे फरहान-विद्या ही जोडी नवीन असली तरी सिद् आणि तृषा हीच मूळ व्यक्तिरेखांची नावे त्यांनी धारण केली आहेत. लग्नानंतरचे आयुष्य आणि ते टिकविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी हा सर्वसाधारणपणे एका आई-बाबा झालेल्या जोडप्याला भेडसावणारे प्रश्न आणि त्यातला गोंधळ असा विषय यात आहे. त्याचबरोबर सिद्चा जवळचा मित्र आणि त्याला वेळोवेळी लग्नसंस्थेतील आनंद टिकावा म्हणून सल्ला देणारा आहे. विशेष म्हणजे ही सिद्च्या मित्राची भूमिका छोटय़ा पडद्यावरचा लोकप्रिय कलावंत राम कपूर याने साकारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा