बॉलिवूडचे नवनवीन कलाकार एकाच वर्षांत दोन किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त चित्रपट स्वीकारताना आणि पूर्ण करताना दिसतात. मात्र खूपच कमी कलाकार एका वर्षांत एकच चित्रपट करण्यावर कटाक्ष ठेवतात. फरहान अख्तरने याच्याही पुढे जात एका चित्रपटासाठी स्वत:ला दोन वर्षे गुंतवून घेतल्याची बातमी समोर आली आहे. ‘फ्लाइंग सिख’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मिल्खासिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘भाग मिल्खा, भाग’ या चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी फरहान तब्बल दोन वर्षे मेहेनत घेत होता.
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आज सगळी इंडस्ट्री आमीर खानकडे बोट दाखवते. तर काही दिवसांपूर्वी किंग खानने आपणही परफेक्शनिस्ट असल्याचा दावा केला होता. मात्र या दोन्ही खानांना मागे टाकत फरहानने आपल्या भूमिकेत अचूकता आणण्यासाठी भरपूर कष्ट घेतले आहेत. मिल्खा सिंग हे भारताची शान आहेत. त्यांची भूमिका पडद्यावर साकारताना ती कुठेही बेगडी वाटणार नाही, ही काळजी घेणे माझे कर्तव्य होते, असे फरहान सांगतो.
धावपटू मिल्खा सिंग यांच्याप्रमाणे आपली शरीरयष्टी तयार करण्यासाठी फरहान दोन वर्षांपासून धावण्याचा सराव करत आहे. रोज पहाटे पाच मैलांची रपेट मारल्याशिवाय पुढे काहीच काम करायचे नाही, असे फरहानने ठरवले होते. त्याचप्रमाणे आपल्या आहारातही फेरफार करत त्याने दुधाचे प्रमाण वाढवले होते. संध्याकाळीही फरहान चांगलाच व्यायाम करायचा. मात्र फरहानच्या या मेहेनतीला चांगली फळे आली आहेत. पडद्यावरचा फरहान अगदी थेट मिल्खासिंग यांच्यासारखा दिसतोच नाही, तर तो त्यांच्यासारखाच धावलाही आहे. फरहानची ही धाव १२ जुलैपासून चित्रपटगृहांत पाहायला मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा