गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक सिनेमे फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे सिनेमे अपयशी होण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जातोय आणि त्याबद्दल चर्चा केली जात आहे. दरम्यान, करोनाच्या दोन वर्षांच्या काळात हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक इतर भाषांमधील डब केलेले चित्रपट आणि परदेशी चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहू लागले आहेत. आता चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये भाषा हा अडथळा राहिलेला नाही. त्यामुळे हल्लीचे प्रेक्षक सर्वच भाषांमधील दर्जेदार कंटेंट डब केलेला किंवा इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेला पाहत आहेत, असं जाणकार सांगतात. बॉलिवूड चित्रपट सातत्याने फ्लॉप होत असल्याने चर्चेचा विषय ठरले आहेत. यावर आता अभिनेता फरहान अख्तरने त्याचं मत मांडत यामागच्या काही कारणांवर चर्चा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी गायिकेचा अपमान; प्रेक्षकांच्या ‘त्या’ कृतीमुळे थांबवावं लागलं गाणं

फरहान अख्तर ETimes शी बोलताना म्हणाला, “आता लोक OTT प्लॅटफॉर्मवर परदेशी कंटेंट मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. प्रत्येकाची त्यांच्या भाषेशी भावनिक जोड असते. तुम्ही तुमच्या भाषेतील भावना चांगल्या प्रकारे समजू शकता. कधीकधी एकच शब्दाद्वारेही खूप भावना व्यक्त होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या भाषेतील कंटेंटची गोष्टच वेगळी असते. पण तुम्ही बाहेरच्या लोकांशी बोलता तेव्हा त्या भावना थोड्या वेगळ्या असू शकतात.”

हेही वाचा – ‘हिला दगड मारा’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना उर्फीचं हटके उत्तर; दगडांपासून बनवला ड्रेस

याबद्दल पुढे बोलताना फरहान म्हणाला, “तुम्ही इंग्रजी कंटेंट पाहणं अगदी सामान्य आहे. पण मला वाटतं आपण आता हे बॅरिअर्स तोडायला हवे. हे करण्यासाठी तुम्हाला काही चांगल्या मार्गाचा विचार करावा लागेल जेणेकरून त्याच भावना कोणत्याही भाषेत व्यक्त करता येतील. त्यामुळे व्यक्तिशः मला हा फार मोठा मुद्दा वाटत नाही. मला वाटतं की जग आता अनेक भाषांमध्ये कंटेंट पाहतंय, ही चांगली गोष्ट आहे आणि ते सर्वांसाठी फायदेशीर आहे.”

हेही वाचा – चित्रपट फ्लॉप झाल्यावर जबाबदारी कोणाची? अक्षय कुमार म्हणाला, “मी मुख्य भूमिका…”

बॉलिवूडला यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील आणि जगभरातील प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना कंटेंट बनवावा लागेल, असे मत फरहान अख्तरने व्यक्त केले. याचे उदाहरण देताना तो म्हणाला, “जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘द अ‍ॅव्हेंजर्स’ने जी पद्धत स्वीकारली तीच पद्धत आपल्याला अवलंबवावी लागेल. कोणं कोणती भाषा बोलतंय हे महत्त्वाचं नाही. तुमच्या प्रेक्षकाला इंग्रजी येतं की नाही हे महत्त्वाचं नाही. कारण या चित्रपटांमध्ये तुम्ही पाहायलाच हवं, असे अनेक घटक होते. त्यामुळे कंटेंट क्रिएटर्स म्हणून आपल्याला भाषेचा विचार न करता उत्कृष्ट कंटेंट तयार करावा लागेल.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farhan akhtar reacts on bollywood flop movies say we should create content for global audience hrc