अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा गुपचूप साखरपुडा पार पडल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात चर्चेत असलेली ही जोडी येत्या मार्च किंवा एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. फरहान-शिबानी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे वारंवार चर्चेत आली आहे. हे दोघे अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. तेव्हापासूनच या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. इतकंच नव्हे, तर दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनलाही दोघांनी एकत्र हजेरी लावली होती.

फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्यानं पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं देखील आहे. फरहानच्या मुलांनीदेखील आता शिबानीसोबतच्या नात्याला हिरवा कंदील दिला असल्याचं समजत आहे. शिबानी नुकतीच फरहानची मुलं आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसली. ‘फरहान आणि शिबानी या नात्याबद्दल खूपच गंभीर आहेत. तसेच फरहानच्या मुलांनादेखील शिबानीची सोबत आवडली त्यामुळे ते दोघंही नक्कीच पुढचा विचार करतील’, असंही त्यांच्या जवळच्या व्यक्तीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

घटस्फोट झाल्यानंतर फरहानचं नावं श्रद्धा कपूरशी जोडलं गेलं. मात्र शक्ती कपूर यांना हे नातं मान्य नसल्यानं त्यांच्या ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर फरहान शिबानीला डेट करू लागला.

Story img Loader