लवकरच विद्या बालन आणि फरहान अख्तरचा ‘शादी के साईड इफेक्ट्स’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाविषयी बोलताना फरहान म्हणाला, या आधीचा माझा ‘भाग मिल्खा भाग’ आणि लवकरच प्रदर्शित होणारा ‘शादी के साईड इफेक्ट्स’ हे दोन्ही चित्रपट भिन्न स्वरुपाचे आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमातसुद्धा तफावत आहे. शादी के साइड इफेक्ट्स चित्रपटाला विनोदी बाज असल्याने प्रसिद्धी कार्यक्रमात मला गाताना आणि नृत्य करताना तुम्ही पाहात असाल. हा चित्रपट गंभीर संदेश देतो, असे काही मी म्हणणार नाही, परंतु नक्कीच हा एक हृदयस्पर्शी चित्रपट आहे. लग्नानंतर सुद्धा भारतीय पुरूष कसे स्वच्छंदी जीवन जगतो, हे या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. विद्या बालन विषयी बोलताना तो म्हणाला, विद्याचा अभिनय अतिशय नैसर्गिक असून, ती एक अदभूत अशी अभिनेत्री आहे. तिच्या आजूबाजूचे वातावरण नेहमी आनंदी असते. तिच्याबरोबर काम करणे म्हणजे धमाल-मस्ती असते. जेव्हा ती दिलखुलास हसते, तेव्हा तुम्हीसुद्धा हसल्या वाचून राहू शकत नाही. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमच्यात चांगली मैत्री निर्माण झाली. आपल्या आगामी वाटचालीविषयी बोलताना तो म्हणाला, मे महिन्यात मी झोयाच्या चित्रपटात काम करायला सुरूवात करणार आहे. या चित्रपटात माझ्याबरोबर प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मादेखील आहेत. या चित्रपटाचे शुटिंग समुद्रकिनारी होणार आहे. यानंतर बिजॉय नांबियार दिग्दर्शित विधू विनोद चोप्रांच्या चित्रपटात मी काम करणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा