अभिनेत्री आणि दिग्दर्शक मनवा नाईकच्या ‘पोरबाझार’ या आगामी मराठी चित्रपटात बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर पाहुण्या कलाकाराची भूमिका वठविताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा वाचल्याक्षणी चित्रपटाचा भाग होण्यास फरहानने तयारी दर्शविल्याचे मनवा म्हणाली. लहान मुलांच्या अवैध्य व्यापारावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटाद्वारे मनवा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. फरहानच्या चित्रपटातील सहभागाविषयी अधिक माहिती देताना ती म्हणाली, आम्ही एका संवेदनशील आणि प्रगल्भ विचाराच्या व्यक्तिच्या शोधात होतो. सामाजिक संदेश देण्यात मदत होईल, अशा अभिनेत्याची आम्हाला गरज होती. अभिनेत्यापेक्षा अधिक काही असलेल्या कलाकाराच्या शोधात आम्ही होतो. फरहान करत असलेले काम पाहून आम्ही त्याच्याशी संपर्क साधला. त्याच्या चित्रपटातून प्रतित होणारे विषय माझ्या विचारांशी मिळते जुळते आहेत. जेव्हा आम्ही त्याला भेटलो, तेव्हा चित्रपटाची कथा वाचल्यावर त्याने चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शविली. चित्रपटाच्या कथेने प्रभावित झाल्यामुळे त्याने चित्रपटात काम करण्यास होकार दिल्याचे मनवा म्हणाली. याआधी तिने दोन लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘स्पेशल स्क्वाड’ आणि ‘बा बहू और बेबी’सारख्या प्रसिद्ध टीव्ही-शोद्वारे मनवाने आपल्या चंदेरी दुनियेतील कारकीर्दीला सुरुवात केली. ‘जोधा अकबर’ चित्रपटातील छोट्याशा भूमिकेद्वारे तिने बॉलिवूडमध्येदेखील आपले नशिब आजमावून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर तिने आपला मोर्चा मराठी चित्रपटांकडे वळविला. आपल्याला अभिनयाची फार आवड असल्याचे सांगत मनवा म्हणाली, मी अनेक प्रकारच्या नाटकांमधून काम केले असून, बालनाट्यापासून टीव्हीवरील मालिकापर्यंत मी विविध भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शनाचा निर्णय मी फार विचारपूर्वक घेतला आहे. ‘पोरबाझार’चे दिग्दर्शन करण्याआधी दोन लघुपट केल्याचे सांगत या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा तिने व्यक्त केली. ती पुढे म्हणाली, दमदार कथा असलेला हा एक मनोरंजनात्मक चित्रपट आहे. अधिकाधिक कुटुंबांनी हा चित्रपट पाहावा, अशी आमची इच्छा आहे. कुटुंबाच्या सुरक्षिततेचे महत्व या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आले आहे. आपली आई लहान मुलांसाठी काम करत असून, तिच्या कामातच कथेचा उगम दडला असल्याचेदेखील तिने सांगितले. मनवाची आई या चित्रपटाची सह-निर्माता आहे. एका सामाजिक संस्थेशी सलग्न असलेल्या मनवाच्या आईचा या विषयीचा अनुभव दाणगा आहे. पोरबाझार चित्रपटात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, चित्रा नवाथे, स्वानंद किरकिरे, चिन्मयी सुमीत, प्राजक्ता कुलकर्णी, स्वरांगी मराठे आणि सत्या मांजरेकर यांच्या भूमिका आहेत. १९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. पुढील आठवड्यात हा चित्रपट सिंगापूरमध्ये दाखविण्यात येणार आहे.
‘पोरबाझार’च्या कथेने फरहान अख्तर प्रभावित
अभिनेत्री आणि दिग्दर्शक मनवा नाईकच्या 'पोरबाझार' या आगामी मराठी चित्रपटात बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर पाहुण्या कलाकाराची भूमिका वठविताना दिसणार आहे.
First published on: 17-09-2014 at 04:34 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farhan akhtar was impressed with porbazaar script director