Diljit Dosanjh PM Narendra Modi Meeting : जगभरात प्रसिद्ध असलेला गायक आणि अभिनेता दलजीत दोसांझने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्याने पंतप्रधान मोदींसोबतच्या संवादाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दरम्यान दलजीत आणि पंतप्रधानांच्या या भेटीवर शंभू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत, “त्याला शेतकऱ्यांची खरंच काळजी असती तर त्याने सर्वात आधी इथे येऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असता”, असे म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर शेतकरी आंदोलकांनी निराशा व्यक्त केली आहे. दलजीत दोसांझने यापूर्वी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. परंतु आता त्याची कृती त्यानेच दिलेल्या पाठिंब्याच्या विरोधात असल्याचेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
सध्या शंभू सीमेवर आंदोलन करत असलेल्या एका शेतकरी नेत्याने दलजीत दोसांझ आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर टीका करताना म्हटले की, “जर दिलजीतला खरोखरच शेतकऱ्यांची काळजी असती, तर तो पंतप्रधान मोदींची भेट घेण्यापेक्षा इथे आला असता आणि संभू सीमेवर डल्लेवालजींसोबत एकजुटीने आमच्यात सहभागी झाला असता, आमच्या समस्या ऐकल्या असत्या आणि त्याने यापूर्वी केलेल्या विधानांवर ठाम राहिला असता. पंतप्रधान मोदींची भेट त्याच्या हेतूबद्दल शंका निर्माण करते.” याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
दरम्यान शेतकऱ्यांनी जोपर्यंत त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रमुख शेतकरी नेते असलेले जगजीत डल्लेवाल नवीन कायद्याद्वारे किमान आधारभूत किंमत (MSP) कायदेशीर करण्याच्या मागणीसाठी ३८ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी शेकडो ट्रॅक्टर-ट्रॉलींसह हजारो शेतकरी एकत्र आले आहेत.
शेतकरी आंदोलनात दलजीतचा सहभाग
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात २०२० मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात दिलजीत दोसांझ सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याची आणि प्रसार माध्यमांनी हे आंदोलन आहे तसेच दाखवण्याची विनंती केली होती. यावेळी बोलताना तो म्हणाला होता की, “हा नवा इतिहास रचलेल्या तुम्हा सर्व शेतकऱ्यांना माझा सलाम. हा इतिहास भावी पिढ्यांना सांगितला जाईल.”