‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही. मात्र महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी अनेकांनी मोलाचं योगदान दिलं आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्धाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती. हा सगळा रोमांचकारी इतिहास ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्यासमोर उलगडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या शूर मावळ्यांच्या पराक्रमावर आधारलेल्या ‘फर्जंद’ या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरवर हा पोस्टर शेअर केला आहे. या लक्षवेधी पोस्टरमध्ये मराठीतील अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळत आहेत. या चित्रपटातून एक शिवकालीन लढाई प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.
‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपीची प्रस्तुती असणारा ‘फर्जंद’ १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोंडाजी फर्जंद’ आणि मावळ्यांनी किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती या धाडसाची गाथा, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद’ या चित्रपटाद्वारे उलगडली जाणार असून आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.