फॅशन शो म्हणजे पंचतारांकित हॉटेल्स, त्यात रंगणारे दिमाखदार सोहळे, उंची कपडय़ांमध्ये वावरणारे सेलेब्रिटीज आणि त्यांना टिपणाऱ्या छायाचित्रकारांच्या नजरा हे साधारण चित्र असतं. पण आता फॅशन शोचा हाच दिमाख भायखळाच्या ‘भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयात’ पाहायला मिळणार आहे. याशिवाय भायखळाच्याच ‘रिचर्ड अ‍ॅण्ड क्रृडास’कंपनीचे पटांगण आणि ‘द ग्रेट इस्टन होम’ येथेही डिझायनर्स आपले कलेक्शन सादर करणार आहेत. १७ तारखेपासून सुरू होणाऱ्या ‘लॅक्मे फॅशन वीक समर/रिसॉर्ट-२०१५’ चा अंतिम फॅशन शो या वस्तू संग्रहालयात आयोजित केला आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच मुंबईच्या एका वस्तू संग्रहालयात अशाप्रकारचा फॅशन शो आयोजित करण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये वर्षांतून दोनदा आयोजित होणारा ‘लॅक्मे फॅशन वीक’ विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये आयोजित केला जातो. पण यंदा या फॅशन वीकचे पंधरावे वर्ष आहे. त्यामुळे याच्या हे वर्ष अनोख्या पद्धतीने साजरे करण्यासाठी पहिल्यांदाच काही बडय़ा डिझायनर्सचे ठरावीक फॅशन शोजमुळे सोहळ्याच्या पटांगणापासून बाहेर घेण्यात येणार आहेत. यामध्ये सोहळ्याचा ‘ग्रॅण्ड फिनाले’ म्हणजेच फॅशन वीकमधील अंतिम फॅशन शो ‘भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयात’ पार पडणार आहे. डिझायनर अनामिका खन्नाच्या कपडय़ांच्या कलेक्शनचा हा फॅशन शो असणार आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या भारतीय लूकच्या कलेक्शन्ससाठी डिझायनर अनामिका खन्ना ओळखली जाते. २००७मध्ये तिला डिझायनर मनीष अरोरासोबत जगातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये कलेक्शन सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय ती अभिनेत्री सोनम कपूर हिची स्टाइलिस्ट म्हणूनही नावारूपास आली आहे. यासोबत विद्या बालन, राणी मुखर्जी यांचा लाडका डिझायनर सब्यासाची मुखर्जी हा लॅक्मे फॅशन वीकची सुरुवात करणार असून त्याचे कलेक्शन भायखळ्याच्या ‘रिचर्ड अ‍ॅण्ड क्रृडास’कंपनीच्या पटांगणात होणार आहे. तसेच बॉलीवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राचे कलेक्शन भायखळाच्याच ‘द ग्रेट इस्टन होम’ येथे पार पडणार आहे.
लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क अशा जगातील कित्येक शहरांमध्ये कित्येकदा खास फॅशन सोहळे वस्तू संग्रहालयात आयोजित केले जातात. न्यूयॉर्कचे ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’, पॅरिसचे ‘लॉव्हर म्युझिअम’ येथे फॅशन शो भरविण्यात आले आहेत. त्याच पावलावर पाऊल ठेवत फॅशन वीकच्या पंधरावे वर्ष दिमाखात साजरे करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

 

Story img Loader