भारतीय प्रेक्षकांना हॉलिवूडपटाचं विशेष आकर्षण आहे. त्यामुळे हॉलिवूडपटासोबतच त्यातील कलाकारांचं क्रेझही ओघाओघाने आलंच. परंतु आता हे चित्र उलट झालं आहे. हॉलिवूडचे काही कलाकारही बॉलिवूड कलाकारांच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळतं. पूर्वी काही हॉलिवूड चित्रपट हिंदी, तेलुगू, मल्याळम यासारख्या भाषांमध्ये डब केले जाई. परंतु आता भारतीय चित्रपटांची संकल्पना बदलू लागली आहे. विविध धाटणीचे चित्रपट, उत्तम कलाकार यांच्या जोरावर आज भारतीय चित्रपट सुपरहिट ठरत आहेत. त्यामुळे आता हॉलिवूड कलाकार बॉलिवूडच्या प्रेमात पडल्याचं दिसून येतं. ‘फास्ट एण्ड फ्युरियस’ या लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटाचा अभिनेता टायरीज गिब्सन, बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता असल्याचं त्याने नुकतंच सांगितलं आहे.
टायरीजने इन्स्टाग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यासोबतच त्याला बिग बींना भेटण्याची इच्छा ही व्यक्त केली आहे. ही पोस्ट शेअर करत असताना टायरीजने अमिताभ बच्चन यांचा फोटोही शेअर केला आहे.
“बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची भेट घेण्याची माझी प्रचंड इच्छा आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की एक दिवस आमची नक्कीच भेट होईल आणि मला त्यांच्याशी हातमिळवण्याची संधी मिळेल. अमिताभ बच्चन यांनी १९० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं”, असं टायरीज म्हणाला.
बिग बींच्या काही चित्रपटांचं कौतुक करत पुढे तो म्हणतो, “जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘शोले’ हे सुपरहिट चित्रपट अमिताभ यांनी बॉलिवूडचा दिले. सुरुवातीच्या काळात त्यांच्या वाट्याला ज्या भूमिका आल्या, त्यामुळे त्यांना ‘एॅग्री यंग मॅन’ हे नावं मिळालं. मात्र त्यांच्या प्रत्येक भूमिका विशेष गाजला. याकारणास्तव आज त्यांना ‘शहशाह’, ‘महानायक’ अशी अनेक विशेषणे मिळाली. पाच दशके बॉलिवूड करणाऱ्या या अभिनेत्याला भेटण्याची माझी प्रकर्षाने इच्छा आहे.
टायरीज गिब्सन हा हॉलिवूड अभिनेता असून त्याने ‘फास्ट एण्ड फ्युरियस’मध्ये रोमन पियर्स ही भूमिका साकारली होती. टायरीज अभिनेत्यासोबतच एक उत्तम गायक, मॉडेल आणि चित्रपट दिग्दर्शक आहे.