‘भाग मिल्खा भाग’ने पहिल्या तीन दिवसांत ३२.२५ कोटी रुपये गोळा करून पहिल्या आठवडय़ात दमदार कमाई करणाऱ्या ‘हिम्मतवाला’ आणि ‘शूटआऊट अॅट वडाला’ या चित्रपटांची आकडेवारीही ओलांडली आहे. देशभरातून ‘भाग मिल्खा भाग’ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी जवळपास १ कोटी रुपयांची आगाऊ तिकीट खरेदी झाली. शुक्रवारी तब्बल साडेआठ कोटी रुपयांचा गल्ला ‘भाग मिल्खा भाग’ने गोळा केला. शनिवारी १०.५० कोटी तर रविवारी १२.२५ कोटी रुपये कमावले.
धावपटू मिल्खा सिंग यांचे ऑलिम्पिकमधील कर्तृत्व, त्यांचा जीवनसंघर्ष चितारणाऱ्या या चित्रपटात मिल्खा सिंग यांची प्रमुख व्यक्तिरेखा फरहान अख्तरने साकारली आहे. ‘भाग मिल्खा भाग’ने दिल्लीमध्ये दोन दिवसांत तब्बल पाच कोटी गल्ला गोळा केला असून प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत इतका प्रचंड गल्ला गोळा करणारा हा दुर्मीळ चित्रपट ठरला आहे. रविवारीही तडाखेबंद आगाऊ तिकीटविक्री झाल्याची माहिती मुक्ता आर्ट्सचे संजय घई यांनी दिली. दिल्ली-पंजाब येथे घडणारी गोष्ट आणि पंजाबी लहेजा असल्यामुळे दिल्ली-पंजाब या परिसरातील प्रेक्षकांनी पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला. या दोन प्रदेशांमधील या चित्रपटाची कमाई ‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटाच्या खालोखाल असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
देशभरातील जवळपास १५०० ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. चालू वर्षांत प्रदर्शित झालेल्या ‘शूटआऊट अॅट वडाला’ आणि ‘हिम्मतवाला’ या चित्रपटांनी प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसअखेर गल्लापेटीवर मिळविलेल्या यशावर ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट मात करू शकेल असे मत बॉलीवूड व्यवसाय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या तीन दिवसांत ‘हिम्मतवाला’ने फार मोठा गल्ला गोळा केला नव्हता. परंतु, पहिल्या आठवडाअखेर मात्र या चित्रपटाने ३१ कोटींचा गल्ला गोळा केला. तर ‘शूटआऊट अॅट वडाला’ या जॉन अब्राहमच्या चित्रपटानेही पहिल्या आठवडय़ात ३०.८० कोटी रुपये कमावले होते.
फरहान अख्तरचा अभिनय आणि या चित्रपटाचे सर्वत्र दाखविण्यात आलेले जबरदस्त ट्रेलर्स यामुळे चित्रपट यशस्वी ठरल्याचे मानले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा