अफाट वेग आणि त्या वेगाच्या साहाय्याने कार रेसिंगमधील काळे विश्व उलगडणारा ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’ या मालिकेतील प्रत्येक चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो.. याच चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या पॉल वॉकरने तर जगभरातील तरुण-तरुणींना वेड लावले. मात्र चित्रपटांमध्ये वेगाने कार चालवणाऱ्या या अभिनेत्याचा मृत्यूही झाला एका कार अपघातात. अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया भागात शनिवारी रात्री एका कार्यक्रमातून परतताना वॉकरच्या कारने रस्त्यावरच पेट घेतला आणि त्यात त्याचा मित्रासह मृत्यू झाला.
वॉकरच्या मालकीच्या ‘रीच आउट वर्ल्डवाइड’ या सामाजिक संस्थेने शनिवारी संध्याकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातून तो आपल्या मित्राच्या ‘२००५ पोर्शे कॅरेरा जीटी’ या कारमधून घरी परतत होता. सँता क्लेरिटा या शहराजवळ ही कार रस्त्यावरच कोसळली आणि तिने पेट घेतला. त्यात मित्रासह वॉकरचा मृत्यू झाला. शहरातील अग्निशमन दलाने आग विझवून या दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
‘फास्ट फ्युरिअस’ या चित्रपटातील ब्रायन ओकॉनर या भूमिकेमुळे वॉकरने जगभरात अनेक चाहते निर्माण केले होते. या चित्रपटाचे सात भाग प्रदर्शित झाले असून, सातही भागांमध्ये त्याच्या ‘साहसी’ भूमिका गाजलेल्या होत्या. ‘इनटू द ब्लू’, ‘शी इज ऑल दॅट’, ‘एट बेल्हो’ आणि ‘टेकर्स’ या चित्रपटांमध्येही त्याने भूमिका केल्या होत्या.

Story img Loader