मातृदिना इतका नसला, तरी पितृदिनही भारतात आता बऱ्यापैकी रुजला आहे. आपल्या आयुष्यात वडिलांचं असलेलं स्थान मान्य करून त्यांचे आभार मानायचा हा दिवस. बाबांकडून मिळालेलं भरपूर प्रेम आणि कौतुकाबद्दल आणि आयुष्यभर पुरेल अशा शिकवणीच्या आणि अनुभवांच्या शिदोरीबद्दल बोलण्याचा हा दिवस नक्कीच खास आहे. बाबा, पप्पा, डॅडी अशा विविध नावांनी आपण वडिलांना हाक मारतो. सर्वांच्या मनात आपल्या वडिलांविषयी एक वेगळेचं प्रेम असतं. आपल्या मुलांच्या पाठीशी आजन्म एखाद्या पर्वताप्रमाणे उभ्या राहणा-या वडिलांसाठी ‘फादर्स डे’ची गरज नाही. पण तरीही आजच्या दिवशी मुले आपल्या वडिलांना विविध भेटवस्तू देऊन त्यांच्याप्रती असलेले आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतात.
Fathers Day 2017 : …हे आहेत प्रेक्षकांना भावलेले ‘बाबा’
मी ही गोष्ट कधीच विसरत नाही की माझ्या आई- वडिलांमुळेच मी आहे. त्यांच्यामुळेच मला हे जग दिसले आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी काहीही केलं तरी ते कमीच असणार आहे. मला स्वतःला असं वाटतं की मदर्स डे किंवा फादर्स डे हे काही एकच दिवस साजरे करायची गोष्ट नाही. हा दिवस रोज आहे असे मानून आपल्या आई-वडिलांसोबत राहिलं पाहिजे. मी लहानपणापासूनच आई- बाबांचे दौरे असल्यामुळे त्यांच्यासोबत फिरायचे. त्यामुळे बागेत समवयस्कर मुलांसोबत खेळतानाच्या आठवणीही माझ्याकडे नाहीत. २४ तास मी माझ्या आई- वडिलांसोबत असते. माझे मित्र-मैत्रिणी फारसे नाहीत.
अनेकांना मी फक्त माझ्या आई- बाबांसोबत दिसते त्यामुळे ते मला तू फार कुटुंबामध्ये वावरतानाच दिसतेस असं म्हणतात. पण हे खरंच आहे. माझे बाबा स्वतः फार प्रतिभावान आहेत. पण त्यांनी माझ्यासाठी त्यांच्या स्वप्नांना मुरड घातली. कुठेही सिनेमाचं चित्रीकरण असलं किंवा दौरे असले की ते माझ्यासोबत प्रवास करतात. आता माझ्या स्वप्नात त्यांनी स्वतःची स्वप्न पाहिली आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यात माझ्या बाबाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यानेच मला एकेरी हाक मारायला सांगितलं. यावरुनच कळेल की तो वडिलांच्या भूमिकेत फार कमी आणि मित्राच्या भूमिकेतच जास्त असतो.
‘फुंतरु’ सिनेमावेळी आमचं रात्रीचं चित्रीकरण होतं. यावेळी मी, माझे बाबा आणि सिनेमाचे निर्माते अजय ठाकूर पहाटे ४-४.३० ला बाहेर फिरायला निघायचो आणि पोहे खाऊन परत चित्रीकरणाच्या ठिकाणी यायचो. असंच एक दिवस करत असताना मी ‘फुंतरु’च्या वेशभूषेतच होते. त्यावेळी गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशाने माझ्या डोळ्यात जे निळे लेन्स घातले होते ते चमकले, त्यामुळे गाडीतला मुलगा फार घाबरला होता. बाबांसोबत असताना अशा गमती जमती होत असतात.
शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com