ठाण्यातील ‘कलामंथन’कडून लघुपटाची निर्मिती
पाश्चात्य संस्कृतीच्या आकर्षणामुळे भारतीय समाजात तेथील रितीरिवाजांचे अंधानुकरण सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणून मोठय़ा प्रमाणात विभक्त कुटुंब पद्धत बोकाळताना दिसत आहे. त्यातूनच नवी पिढी पालकांबाबत असलेले कर्तव्य विसरताना दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर मुलांना पालकांविषयीच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा ‘फादर्स डे’ हा लघुपट ठाण्यातील कलामंथन या नाटय़संस्थेने तयार केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार जुने ठाणे म्हणून ओळख असलेल्या नौपाडा, पाचपाखाडी, हिंदू कॉलनी, ब्राह्मण सोसायटी परिसरातील सुमारे पाच ते सात हजार जेष्ठ नागरिक घरात बराच काळ एकटे अथवा दुकटे राहतात. या जेष्ठांची अपत्ये परदेशात, अन्य शहरांत अथवा ठाण्यातल्याच घोडबंदर भागात स्वतंत्र संसार मांडून राहत आहेत. या गोष्टीचा विचार करुन कलामंथन या संस्थेने १८ जूनला ‘फादर्स डे’चे औचित्य साधून हा लघुपट तयार केला आहे.
दीड वर्षांपूर्वीच ठाणे पोलिसांनी ‘कर्तव्य’ नावाचा उपक्रम जेष्ठांसाठी सुरू केला होता. क्रिकेटर सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाला फार तुरळक प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी या उपक्रमाकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे या उपक्रमाच्या फायली पोलीस दरबारात धुळ खात पडल्या आहेत. जेष्ठांनीही या उपक्रमाकडे नंतर पाठ फिरवली. आपली पोटची मुलेच आपल्याकडे लक्ष देत नसल्याने पोलीस काय देणार असा प्रश्न कदाचित जेष्ठांना पडला असवा.
कलामंथनने तयार केलेल्या या लघुटात सँडी उर्फ संदीप नावाच्या पेशाने संशोधक असलेल्या तरुणाची कथा आहे. जो सध्या अमेरिकेत त्याची पत्नी आणि छोटय़ा मुलीसोबत स्थायिक झाला आहे. आईचे निधन झाल्यानंतर त्याला वडिलांनी वाढविले. मात्र, कालांतराने वडिलांसोबत त्याचा संबंध जवळ जवळ तुटतो. यानंतर पुढील वेगवेगळ्या घटना त्याच्या आयुष्यात कशा घडतात असा २० मिनिटांचा हा लघुपट आहे. याचा शेवटही तितकाच हृदय हेलवणारा आहे.
आईवडील मोठय़ा कष्टाने आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात, मुलांचा उत्कर्ष घडवितात. एक आईवडील म्हणून मुलांच्या बाबतीतील आपलं कर्तव्य पार पाडतात. पण आज आजुबाजुला लक्ष टाकलं तर असं दिसून येतं की, स्वत:च करिअर घडविण्याच्या नादात मुलं मात्र आईवडिलांच्या बाबतीतील स्वत:च कर्तव्य मात्र विसरत चालली आहेत, असे कलामंथचे चिंतामणी वाडेकर यांनी सांगितले.