कलाविश्वामध्ये आजवर अनेक धाटणीच्या, विविध कथानकांच्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. यात आईवर आधारित किंवा तिची महती सांगणारे अनेक चित्रपट आहेत. मात्र वडिलांवर आधारित फार मोजके चित्रपट असल्याचं पाहायला मिळतं. आज ‘फादर्स डे’ निमित्त अशा काही चित्रपटांविषयी जाणून घेऊ जे वडिलांवर आधारित आहेत.

१) मुघल- ए- आजम –

१९६० साली प्रदर्शित झालेला मुघल-ए-आजम हा चित्रपट आजही लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत असल्याचं पाहायला मिळतं. या चित्रपटात दिलीप कुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अकबराच्या दरबारातील नर्तकीवर त्याच्या मुलाचा जीव जडतो. यानंतर सलीम- अनारकली यांच्या प्रेमकहाणीसोबतच अकबर- सलीमचा संघर्षही या चित्रपटात दिसून येतो. या चित्रपटातून वडील-मुलाचे नाते दाखवण्यात आले आहे. ‘के.आसिफ’ यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन चित्रपट मानला जातो.

२.  दंगल –
आमिर खानने केलेल्या अनेक उत्तम चित्रपटांपैकी हा एक आहे. ‘दंगल’ हा चित्रपट कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता, बबिता यांच्या जीवनावर आधारित आहे. छोट्याश्या गावात कुस्तीपटू महावीर फोगट यांनी मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी केलेल्या संघर्षाचा कथाभाग या चित्रपटात आला आहे. आपल्या मुलींच्या यशासाठी त्यांनी केलेल्या त्याग बघून डोळ्यांच्या कडा पाणावतात. या चित्रपटात आमिरसोबत फातिमा सना शेख व सान्या मल्होत्रा झळकल्या होत्या.

३. अकेले हम अकेले तुम –
आमिर खान आणि मनीषा कोईरालाचा हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील आमिरचे त्याच्या मुलावर खूप प्रेम असते. पण, त्याची बायको स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवऱ्याला सोडून जाते. चित्रपटात आदिल रिजवीने आमिरच्या मुलाची भूमिका साकारली आहे. मनीषा कोईरालाने आमिरच्या पत्नीची भूमिका निभावली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मंसूर खान यांनी केले होते.

४. पिकू
हा चित्रपट वडील मुलीच्या गोड नात्यावर आधारलेला आहे. आई नसल्यामुळे या चित्रपटातील मुलगीच वडिलांच्या लहानसहान गोष्टींची काळजी घेते. स्वतःच्या इच्छांना मारत ती कायमच वडिलांना प्राधान्य देते. या चित्रपटात वडिलांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी तर मुलीची भूमिका दीपिका पदुकोणने साकारली आहे.

५. 102 नॉट आउट
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी १०२ वर्षाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तर, ऋषि कपूर यांनी त्यांच्या ७५ वर्षीय मुलाची भूमिका केली होती. बऱ्याच काळानंतर या दोन दिग्गज नेत्यांना मोठ्या पडद्यावर चाहत्यांना पाहायला मिळाले होते.

उमेश शुक्ला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

Story img Loader