गेल्या काही दिवसांपासून आपल्या शाही विवाह सोहळ्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला अभिनेता विकी कौशल लवकरच बहुचर्चित चित्रपट ‘सॅम बहादूर’मध्ये झळकणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून या चित्रपटाची सोशल मीडयावर जोरदार चर्चा सुरू आहे. यातील विकी कौशलच्या लूकची सर्वाधिक चर्चा झाली होती. त्यानंतर आता विकी कौशलच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या चित्रपटाबाबत विकीनं सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटात देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची भूमिका कोण साकारणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पण आता या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार याची माहिती विकी कौशलनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून दिली आहे. विकीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर अभिनेत्री सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख आणि मेघना गुलजार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

विकीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करताना लिहिलं, ‘आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आम्ही आज मेघना गुलजार यांचा वाढदिवस साजरा करत आहोत आणि यासोबतच आमच्या चित्रपटातील मुख्य भूमिकेतील अभिनेत्रींचे स्वागत करत आहोत.’ तसेच या चित्रपटात अभिनेत्री सान्या मल्होत्रा सॅम माणेकशा यांची पत्नी सिल्लू मानेकशा यांच्या भूमिकेत तर अभिनेत्री फातिमा सना शेख श्रीमती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचंही विकीनं त्याच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. याशिवाय मेघना गुलजार, अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांनाही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.

माणेकशा यांची लष्करी कारकीर्द चार दशके आणि पाच युद्धांची होती. फील्ड मार्शल पदावर पदोन्नती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते आणि 1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय लष्कराचा निर्णायक विजय लष्करप्रमुख म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. विशेष म्हणजे या वर्षी 1971 च्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाली.

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार करत आहेत. दरम्यान विकी कौशल काही दिवसांपूर्वीच त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्नाच्या बेडीत अडकला. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती. आता लग्नानंतर लवकरच विकी कौशल आणि टीम ‘सॅम बहादूर’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.

Story img Loader