अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सि’ या चित्रपटाची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कंगना या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. याबरोबच कंगना याचं दिग्दर्शनही करत आहे. या चित्रपटाचा जेव्हा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला तेव्हा लोकांनी कंगनाचं खूप कौतुक केलं. आता कंगना पाठोपाठ आणखीन एक बॉलिवूड अभिनेत्री आपल्याला इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख ही लवकरच विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटात झळकणार आहे. फातिमा या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर बेतलेलं एक पुस्तक तिने शेअर केलं. त्यापाठोपाठ लगेचच तिने या भूमिकेच्या तयारीचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने “ही सॅम बहादूरची सुरुवात आहे.” असं कॅप्शनही दिलं आहे.
या चित्रपटात विकी कौशन सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची घोषणा आधीच झालेली होती. कोविडमुळे चित्रपटाला वेळ लागत असून लवकरच याचं चित्रीकरण पूर्ण होईल असंही सांगण्यात येत आहे. या चित्रपटात दंगल फेम फातिमा आणि सान्या या दोघी पुन्हा एकत्र दिसणार आहेत. फातिमा इंदिरा गांधीजी यांची आणि सान्या मल्होत्रा ही सॅम यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
आणखी वाचा : ‘ब्रम्हांश’च्या गुरुचा पत्ता गुगल मॅपवर कसा काय? नेटकऱ्याच्या प्रश्नाला करण जोहरने दिलं उत्तर
फातिमासाठी ही भूमिका तशी अत्यंत महत्त्वाची आहे. याआधी तिने केलेले चित्रपट तिच्या वयाला साजेसे असे होते. ही भूमिका मात्र तिच्यासाठी आव्हानात्मक ठरेल असंही म्हंटलं जात आहे. शिवाय कंगनाच्या अभिनयाशी बरोबरी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सध्या प्रेक्षकांची पहिली पसंती कंगनाला असल्याचं स्पष्ट होत आहे. अर्थात कुणाचं काम उत्तम आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच ठरेल. फातिमाने याआधी दंगल, लुडोसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे.