रेश्मा राईकवार
चित्रपट : फत्तेशिकस्त
शिवाजी महाराजांची युद्धनीती, त्यांचा गनिमी कावा, त्यांनी यशस्वी केलेल्या मोहिमा हा इतिहास आजही ऐकला तरी अंगावर रोमांच उभे राहतात. शिवरायांच्या इतिहासातल्या अनेक गोष्टी आपण लहानपणीपासून पाठय़पुस्तकातून अभ्यासल्या आहेत. नाटक-चित्रपट यातूनही त्या पाहिलेल्या आहेत, मात्र अजूनही त्या गोष्टी मराठी मनांना आकर्षित करतात. अर्थात, गोष्ट सांगणे आणि पडद्यावर ती तितक्याच प्रभावीपणे मांडणे या दोन्हींत फरक आहे. विशेषत: सध्या चित्रपट तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झालेला असताना त्याचा योग्य आणि पुरेपूर वापर करत या गोष्टींमधला थरार पडद्यावर जिवंत करणे शक्य झाले आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘फर्जद’ या पहिल्याच चित्रपटात त्याची प्रचीती आणून दिली होती. ‘फत्तेशिकस्त’मध्ये शिवरायांच्या गनिमी काव्याचा रुपेरी विस्तार अधिक व्यापक आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशा पद्धतीने मांडणी करत त्यांनी कामगिरी फत्ते केली आहे.
शिवाजी महाराज आणि त्यांनी लढलेल्या प्रत्येक मोहिमा यांच्यात त्यांच्याबरोबरचे सरदारही तेवढेच महत्त्वाचे होते. एकेका मोहिमेपुरती आपण काही नावे ऐकलेली असतात, मात्र प्रत्यक्षात त्या घटनेच्या वेळी काय घडले असेल? महाराजांचे सरदार त्यांच्याबरोबर क से वावरले असतील? नेमकी खेळी कशी रचली असेल? याचा सांगोपांग विचार करत शिवरायांनी केलेल्या पहिल्यावहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार दिग्दर्शकाने या चित्रपटात रंगवला आहे. महाराज पन्हाळ्यावर कैद असताना मराठी मुलखात मुघल, आदिलशाही सगळ्यांनीच अराजक मांडले होते. खुद्द पुण्यात शाहिस्तेखानाने थैमान घातले होते. या परिस्थितीत पन्हाळ्याहून शिताफीने सुटून स्वराज्यात परतलेल्या शिवाजी महाराजांनी कसा मार्ग काढला? स्वराज्याच्या शत्रूंना अद्दल घडवण्यासाठी महाराजांनी कोणत्या पद्धतीने या हल्ल्याचे नियोजन केले? आणि त्यासाठी महाराजच नव्हे तर बहिर्जी नाईक, त्यांचे मदतनीस किसना आणि केशर यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून शत्रूच्या गोटात शिरून काढलेली माहिती, बहिर्जीच्या मदतीने के लेली मोहिमेची आखणी आणि तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी सर्जेराव जेधे, कोयाजी बांदल, चिमणाजी आणि बाळाजी देशपांडे अशा शूर सरदारांबरोबर मिळून महाराजांनी फत्ते केलेली मोहीम या चित्रपटात पाहायला मिळते.
या चित्रपटाची कथा-पटकथाही खुद्द दिग्दर्शकानेच लिहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला जे मांडायचे आहे त्यावरच लक्ष केंद्रित करून लिहिलेल्या कथेला दिग्दर्शकाने योग्य पद्धतीने न्याय दिला आहे. शिवाजी महाराजांची कथा म्हटल्यावर त्यात त्यांनी बांधलेले अभेद्य गडकिल्ले आले, महाराजांचे मावळे आले, महाराजांवर श्रद्धा ठेवून त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारी रयत आली अशा अनेक गोष्टींचे भान दिग्दर्शकाने ठेवले आहे. महाराजांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागचा तर्क, विवेक हा प्रत्येकाला सहज कळणे शक्य नाही, पण तरीही तो त्यांनी घेतला आहे म्हणजेच त्यामागे काहीएक विचार आहे, या विश्वासाने त्यांचा प्रत्येक सरदार, मावळा वागत होता. एका शूरवीर, बुद्धिमान आणि तितक्याच विवेकाने, संयमाने राज्य करणाऱ्या या धोरणी राजाच्या विचारांचा त्याच्या जनतेवर काय परिणाम झाला होता, असे बारीकसारीक तपशीलही कथेच्या ओघात दिग्दर्शकाने मांडले आहेत. इतकेच नाहीतर महाराजांचा प्रत्येक सरदार त्या त्या वैशिष्टय़ांसह एका शैलीदार पद्धतीने सादर करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्नही प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन जातो. जिजाऊंनी शिवबा घडवला हे खरेच, पण महाराज पन्हाळ्यावर कैदेत असताना राजगडावर चालून आलेल्या गनिमावर तोफेचे गोळे बरसवण्यासाठी स्वत: हाती तलवार घेऊन उभ्या राहिलेल्या रणरागिणी जिजाऊही यात दिसतात. आणि त्याच धीराने सुनेला अश्रू पुसून स्वराज्याचा संसार कर, असे सांगणारी खंबीर सासूही यात दिसते. प्रत्येक व्यक्तिरेखेचे तपशीलवार केलेले चित्रण ही या चित्रपटाची खूप मोठी जमेची बाजू आहे. याशिवाय, ड्रोनच्या साहाय्याने केलेले गडकिल्ल्यांचे चित्रण, अंगावर येणारे आणि शत्रूलाही चकवणारे सह्य़ाद्रीचे खोरे शिवकालीन इतिहासातल्या या अचंबित करणाऱ्या गोष्टी पाहताना आपल्यालाही विचार करायला लावतात. उत्तम कथा, उत्तम मांडणी या जोडीला दिग्दर्शकाने केलेली उत्तम कलाकारांची निवड यामुळे कामगिरी अर्धी फत्ते आधीच झाली, असे म्हणायला हरकत नाही.
‘फर्जद’ या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी केली होती, इथेही त्याने महाराजांची भूमिका त्याच सहजतेने आणि तडफदार बाण्याने रंगवली आहे. पुन्हा एकदा जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी यांना पाहणे ही रसिकांसाठी पर्वणी आहे. बाकी प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा कलाकारांनी उत्तम काम करत आपापल्या वाटय़ाला आलेल्या भूमिकांमध्ये रंग भरले आहेत. कोणत्या कलाकाराने कोणती भूमिका केली आहे, हे इथे नमूद करणे योग्य ठरणार नाही, कारण खूप चांगल्या पद्धतीने दिग्दर्शकाने या भूमिकांचा प्रवेश रंगवला आहे. त्यामुळे कलाकारांची ही नवलाई पडद्यावर पाहतानाच जास्त रंगत येईल. पूर्वार्धात केलेली मांडणी थोडी लांबल्यासारखी वाटू शकते, मात्र मुघल सरदाराचे हळूहळू कशा पद्धतीने मानसिक खच्चीकरण महाराजांनी केले, हे रंगवण्यासाठी अशा पद्धतीची मांडणी आवश्यक वाटते. अर्थातच, ही लांबी कमी करता आली असती, पण त्यामुळे चित्रपट कुठेही रटाळ झालेला नाही. उगाच आकर्षक पद्धतीने गाण्यांचे चित्रण करून ते मध्ये टाकण्यापेक्षा कीर्तन, गोंधळ आणि क व्वाली या तिन्हीचा वापर गोष्ट पुढे नेण्यासाठी दिग्दर्शकाने केलेला आहे. चित्रपटाच्या जमेच्या बाजू अधिक आहेत, म्हणून एक परिपूर्ण कलाकृती असे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरेल. पण एक परिपूर्ण कलाकृती साकारण्याची शिकस्त दिग्दर्शकाने निश्चितच केली असल्याने चित्रपटाची मोहीम फत्ते झाली आहे.
दिग्दर्शक – दिग्पाल लांजेकर
कलाकार – चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, हरीश दुधाडे, अजय पूरकर, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, दिग्पाल लांजेकर, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, अनुप सोनी, समीर धर्माधिकारी, निखिल राऊत, तृप्ती तोरडमल, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, रुची सावर्ण, नक्षत्रा मेढेकर.