ख्यातनाम संगीतकार ए.आर.रेहमान आणि चित्रपट निर्माते माजिद माजिदी यांच्या विरोधात मुंबईस्थित सुन्नी गटाने फतवा काढला आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित ‘मोहम्मद: मॅसेंजर ऑफ गॉड’ या आगामी चित्रपटावर देशातील मुस्लिमांनी बहिष्कार टाकण्याची मागणी करणारा फतवा रजा अकादमी जारी केला आहे. तसेच या चित्रपटावर बंदीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र रजा अकादमीने पाठविले आहे.

इराणमधील चित्रपट निर्माते माजिद माजिदी यांनी मोहम्मद ‘मॅसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाची निर्मिती केली असून संगीकार ए.आर.रेहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. मात्र, चित्रपटाशी संबंधित व्यक्तींनी या चित्रपटाच्या माध्यमातून इस्लामचा उपहास केल्याचा दावा करीत रजा अकादमीने नाराजी व्यक्त केली आहे.

चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखांसाठी बिगर-मुस्लिम कलाकारांनी निवड यावरही अकादमीने आक्षेप नोंदविला आहे. चित्रपटाची निर्मिती करणाऱया माजिद माजिदी यांनी इस्लाम धर्म अपवित्र केला असून त्यांनी आता पुन्हा एकदा कलमा वाचावा असेही या फतव्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ए.आर.रेहमान यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.