पॅलेस्टाइनच्या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले आहे.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे दोन्ही देशांतील १६०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अनेक नागरिकांना ओलीस ठेवले आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर अनेक बॉलीवूड कलाकार आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अलीकडेच ‘फौदा’ या मालिकेत डोरोन कॅव्हलीची भूमिका साकारणारा इस्रायली अभिनेता लिओर राझने त्याच्या इन्स्टाग्रामवर युद्धाचा एक लाईव्ह व्हिडिओ शेअर केला आहे. लिओर यांनी त्यांच्या एका जुन्या ट्वीटर अकाऊंटवर या युद्धाचा लाइव्ह व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेता इस्त्रायली डेमोक्रेसी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष योहानन प्लेसनर आणि पत्रकार अवी यिसारोव्ह यांच्यासोबत दक्षिण इस्रायलमधील सेडरॉटच्या भिंतीच्या मागे लपलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक रॉकेट त्याच्या डोक्यावरुन जाताना दिसत आहे. अभिनेता बनण्यापूर्वी लिओर राजने इस्रायली लष्करात मध्ये सेवा बजावली होती.
२४ नोव्हेंबर १९७१ रोजी जन्मलेल्या लिओर राझने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या इस्रायली टीव्ही मालिका ‘फौदा’मध्ये पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचे चित्रण केले होते. या मालिकेत दोन्ही देशांच्या एजन्सी कशा काम करतात हेही दाखवण्यात आले होते. लिओर राझ यांनी २००० साली ‘डेल्टा फोर्स वन: द लॉस्ट पेट्रोल’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
इस्रायलच्या सीमेवर आणि गाझा पट्टीत विध्वंस सुरू आहे. हमासने १५० हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. इस्रायलच्या प्रतिहल्ल्यानंतर हमासची पिछेहाट झाली आहे. गाझा पट्टीचा काही भाग इस्रायली सैन्याने आपल्या ताब्यात घेतला आहे. अशातच हमासने १५० ओलिसांना ठार करण्याची धमकी दिली आहे. “आमच्यावर हल्ला केलात, गाझा पट्टीत रॉकेट हल्ले केले तर कोणत्याही क्षणी आम्ही ओलिसांना ठार करू”, अशी धमकी हमासचा प्रवक्ता अबू उबैदा याने इस्रायलला दिली आहे. तर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी “हे युद्ध आम्ही सुरू केलं नसलं तरी या युद्धाचा शेवट आम्हीच करू”, असा इशारा हमासला दिला आहे.