भयपटांचा ठरीव फॉम्र्युला माहीत असला तरी चित्रपट पाहायला मजा येते. ‘रामसे’ प्रभावाखालील बॉलीवूड भयपटांमध्ये विक्रम भट यांनी अनेक चित्रपट केले आहेत. ‘१९२०’ या भयपटाचा सीक्वेलपट असलेल्या ‘१९२० ईव्हिल रिटर्न्स’ मध्ये ‘१९२०’ मधील कथानक पुढे सरकत नाही. तर नवीन कथानक घेतले आहे. सुमार नटसंच असला तरी पाश्र्वसंगीत, गाणी यामुळे चित्रपट सुसह्य ठरतो. मध्यांतरानंतर प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. या फॉम्र्युलेबाज भयपटामध्ये ‘द एक्झॉर्सिस्ट’ या गाजलेल्या चित्रपटाची अनेक दृश्यांमध्ये नक्कल करण्यात आली आहे.
चित्रपटाची नायिका स्मृती (टिया बाजपेयी) एका पिशाच्चामुळे प्रियकराला भेटण्यासाठी घरातून जाऊ शकत नाही इथपासून चित्रपटाला सुरुवात होते. तिचा नोकर तिला प्रियकरापर्यंत सुखरूप पोहोचता यावे म्हणून एक जादुई आरसा देतो. तो घेऊन ती पत्रातून प्रियकर बनलेल्या जयदेव वर्मा (आफताब शिवदासानी) या कवीला भेटायला निघते. परंतु, भूत तिला अडवते आणि मारून टाकते. कवी जयदेव वर्माला निरोप येतो की त्याची प्रेयसी स्मृती मरण पावली. त्यामुळे जयदेव वर्मा त्या दु:खात मद्याच्या आहारी जातो. आपल्या कवितेची प्रेरणा असलेली स्मृती मरण पावल्याने हतबल होतो. जगण्यासाठी प्रेरणा हवी, ती नसेल तर जगायचे कशाला? मरता येत नाही म्हणून तो मद्याच्या आहारी जातो. एक दिवस एका नदीच्या किनारी त्याला स्मृती बेशुद्धावस्थेत सापडते. पण दोघांनी एकमेकांना पाहिलेले नसल्यामुळे जयदेव तिला ओळखत नाही. तिला घरी घेऊन जातो परंतु, तिला स्वत:चे नावच काय गाव-घर-वडिलांचे नाव काहीच आठवत नाही. अनोळखी तरुणीला घरी ठेवणे धोक्याचे आहे असे जयदेवची बहीण करूणा (विद्या माळवदे) सांगते. परंतु, स्मृतीसोबत आपले काहीतरी नाते आहे, जगण्याची प्रेरणा परत मिळाली असे वाटतेय. त्यामुळे जयदेव स्मृतीला जाऊ देत नाही. स्मृतीला काहीच आठवत नसल्यामुळे जयदेव तिचे नाव संगीता असे ठेवतो. संगीताला पाहिल्यावर स्मशानात काम करणारा एक माणूस हिच्यात वाईट शक्ती आणि प्रेतात्म्याचा अंश आहे आणि ती सगळ्याचा नाश करण्यासाठी इथे आली आहे, तिला घरातून हाकलून द्या असे जयदेवला सांगतो. आता तिला कुठल्या भूताने पछाडले आहे, याचा शोध चित्रपटात घेण्यात आला आहे.
चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच कथानक १९२० मध्ये घडत असल्यामुळे कवी जयदेव वर्मा आणि त्याची बहीण एका सिमलाजवळच्या एका पहाडी प्रदेशात भल्यामोठय़ा हवेलीत राहतात. पहाडी प्रदेशातील निसर्गसौंदर्यापेक्षा भयपट असल्यामुळे धुक्यात हरवलेली निबीड अरण्यातून जाणारा रस्ता, नायिकेला हमखास रात्रीच्या वेळीच घोडागाडीतून प्रवास करण्याची हुक्की येणे, स्मृतीला तिच्या खोलीत भयानक आवाज येणे, भूताचा चेहरा दिसणे वगैरे या गोष्टी अनिवार्य असतात हे गृहित धरूनच प्रेक्षक चित्रपट पाहतो. त्यामुळे भयपटापेक्षा त्याला या ठरीव गोष्टी हास्यास्पद वाटतात. स्मृती गेलेली संगीता जेवता जेवता उलटी करते आणि तिच्या तोंडातून खिळे, लोखंडी वस्तु बाहेर पडतात यातून तिला भूताने पछाडले आहे हे दाखविण्याच प्रयत्न केला गेलाय. डोळे लाल-पांढरे दाखवून भूताची बाधा झालेली दाखविणे हा अतिशय जुनाट प्रकार इथे वारंवार करण्यात आल्याने कंटाळा येतो. संगीताला कोणत्या भूताने पछाडलेय हे जयदवे वर्माला त्याची बहीण करूणा हिच्या आत्महत्येनंतर समजते आणि मग सुरू होतो त्या भूताला नष्ट करण्याचा प्रयत्न. मध्यांतरापर्यंत अतिशय रटाळपणे जाणारे कथानक मध्यांतरानंतर वेगवान होते. ठरीव फॉम्र्युला असला तरी भयपट पाहण्याची मजा आणि कथानकाचे वर्तुळ पूर्ण झाल्यावर गूढाची उकल झाल्यामुळे मिळणारा आनंद यासाठी प्रेक्षक भट कॅम्पचे भयपट एकदा तरी पाहतो. मात्र भट कॅम्पच्या यापूर्वीच्या भयपटांच्या तुलनेत हा चित्रपट अगदीच टुकार आणि रटाळ आहे. कुठल्याही कोनातून पाहिले तरी आफताब शिवदासानी कवी वाटत नाही, अखंड चित्रपट मख्ख चेहऱ्याने पडद्यावर वावरणे हा त्याचा स्थायीभाव आहे. चित्रपटात आफताबसह टिया बाजपेयी, विद्या माळवदे यांनी आपल्या सुमार अभिनयाचा उत्तम नमुना दाखविला आहे. दोन गाणी मात्र श्रवणीय आहेत. चित्रपट खूप लांबत असल्यामुळे आणि भयपट पाहताना भीती वाटण्याऐवजी हास्यास्पद वाटत असल्यामुळे प्रेक्षक न कंटाळला तरच नवल.
’ बीव्हीजी फिल्म्स निर्मित
१९२० एव्हिल रिटर्न्स
निर्माता – विक्रम भट
दिग्दर्शक – भूषण पटेल
लेखक – विक्रम भट, अमीन हाजी
पटकथा – रेन्सिल डिसिल्व्हा
छायालेखक – नरेन गेडिया
संकलक – स्वप्नील राज
संगीत – चिरंतन भट
कलावंत – आफताब शिवदासानी, टिया बाजपेयी, विद्या माळवदे, शरद केळकर व अन्य.