मुंबईकरांच्या ‘स्पिरिट’बद्दल खूपदा बोललं जातं. रेल्वेतील बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला किंवा तत्सम संकटांनंतर दुसऱ्याच दिवशी किंवा दुर्घटना घडल्यानंतर काही वेळातच मुंबई पूर्वपदावर येते. या महानगरीचे सारे व्यवहार पूर्ववत सुरू होतात. जणू काही घडलंच नाही अशा तऱ्हेनं सगळेजण आपापल्या कामाला लागतात. मुंबईकरांना ना त्या घटनेची दहशत वाटत, ना तिनं ते हादरत. ना त्या घटनेचा शोक मनवत ते हात-पाय गाळून बसत. ना त्यातून काही शिकत. किंवा ना अशा गोष्टींचा सामना करण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजत! मुंबईचं हे खरोखरीच ‘स्पिरिट’ आहे की बधीरता, हा प्रश्नच आहे. जोवर आपल्याला त्या घटनेची प्रत्यक्ष झळ पोहोचत नाही तोवर मुंबईकर उमेदीनं पुढे चालतच राहतो. हेच आता आपल्याला देशाच्या बाबतीतही अनुभवायला मिळतंय. सर्वच स्तरांवर लाखो कोटी रुपयांचे घोटाळे, भ्रष्टाचार, अनाचार उघड होताहेत. त्यातल्या एखाद्या प्रकरणाचा फारच गवगवा झाला किंवा अतीच अंगाशी आलं तर एखादा चौकशी आयोग नेमून किंवा न्यायालयीन जंजाळात ते प्रकरण खितपत टाकून राजकारणी मोकळे होतात. गलेलठ्ठ फी घेणाऱ्या वकिलांच्या ‘हुशारी’वर अशी प्रकरणे मग वर्षांनुवर्षें न्यायालयात सडत राहतात. त्यांचा ‘निकाल’ कधीच लागत नाही. आणि प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असं सांगून संबंधित हात वर करतात आणि पुन्हा नवे ‘उद्योग’ करायला मोकळे होतात. अशा प्रकरणांत अडकलेली मंडळी पुढे निवडणुका लढवून जनमताचा कौल घेऊन ‘जनतेचा न्यायालया’त निर्दोष सुटतात आणि पुनश्च भ्रष्टाचार करण्यासाठी नव्यानं सज्ज होतात.
..तर आहे हे असं आहे. आपण सगळेच मुर्दाड, बधीर होत चाललो आहोत. आपल्याला कशाचंही काही वाटेनासं झालेलं आहे. सगळी चोरांचीच दुनिया असल्यावर इथं काहीच बदल घडणार नाही म्हणताना उगाच कशाला डोक्याला नस्ता ताप करून घ्या, अशी लोकांची मनोधारणा बनत चाललीय. भावना, संवेदना यांना आता आपल्या जीवनात स्थान उरलेलं नाही. व्यवहार, आपमतलब हाच या युगाचा मंत्र आहे आणि जो- तो आपल्या परीनं त्याला शरण जातो आहे. या पाश्र्वभूमीवर ‘एका क्षणात’ हे संदीप जंगम लिखित, शरद पोंक्षे लिखित नवं नाटक माऊली प्रॉडक्शननं नुकतंच रंगभूमीवर आणलं आहे. या नाटकाला वर उल्लेखित वास्तवाचा ऊहापोह करायचाय.
‘सायको ड्रामा’च्या अंगानं जाणारं हे नाटक पूर्वार्धात कशाबद्दल आहे, याचा थांगपत्ताच लागत नाही. यातली दोन पात्रं- सपना आणि प्रीतम- यांच्यापैकी एकजण किंवा दोघंही मानसिक रुग्ण असावेत इतपत अदमास येतो खरा. रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हे घडलंय हेही स्पष्ट होतं. दिसतात ती दोघं नवरा-बायकोसारखी; परंतु नाटकात दाखवलं जातंय मात्र ते बहीण-भाऊ असल्याचं! ही काय भानगड आहे, या प्रश्नाचा भुंगा आपल्याला पोखरत असतानाच घरातल्या परस्परांशी वागण्या-बोलण्यात दोघंही एकमेकांना ‘स्मार्टली’ हाताळताहेत असं दिसतं. त्याअर्थी त्यांच्यापैकी एकात किंवा दोघांतही काहीतरी गडबड आहे हे समजतं. प्रीतम मधेच हिंस्र बनतो, तर सपनासुद्धा मनोरुग्णाईतासारखीच वागते, वावरते. बरं, ज्या डॉक्टरांचा किंवा वृषाली नावाच्या सपनाच्या मैत्रिणीचा वारंवार उल्लेख होतो, ते काही आपल्यासमोर येत नाहीत. त्यामुळे प्रॉब्लेम नेमका काय आहे, हेच कळत नाही. बरं, संपूर्ण पहिला अंकभर हेच चक्र फिरत राहतं. नाटक पुढं सरकतच नाही. दुसऱ्या अंकातही तेच! फक्त बदल इतकाच, की ज्या डॉक्टरांचा पहिल्या अंकात सतत उल्लेख होत असतो ते आता प्रत्यक्षात अवतरतात. या डॉक्टरांचं वागणं-बोलणंसुद्धा सुरुवातीला काहीसं संशयास्पद वाटावं असंच. परंतु हळूहळू ते सपनाला विश्वासात घेतात, तिला बोलतं करतात आणि मग सगळ्या कोडय़ाचा उलगडा होतो आणि कोंडी फुटते. तोवर ऐंशी टक्के नाटक झालेलं असतं. इथून पुढं नाटकात वेगानं घटना घडतात आणि प्रश्न सुटतो.
लेखक संदीप जंगम यांनी या सायको ड्रामाची सस्पेन्स थ्रिलर स्वरूपात मांडणी का करावी, हे समजत नाही. समाजाच्या बथ्थडपणावर जर त्यांना भाष्य करायचं असेल, तर मग त्यांनी ते थेटपणे का करू नये? त्यासाठी डोक्यामागून घास घेण्याची गरज काय? बरं, हे जे काही त्यांचं म्हणणं आहे ते प्रेरणा ऊर्फ सपनाच्या तोंडून ते वदवतात. प्रत्यक्ष नाटय़ात्म विधानातून नाही! त्यामुळे ते ठिगळासारखं वाटतं. खरं तर रेल्वे-बॉम्बस्फोटामुळे एक कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं, हे दाखवत असताना त्यातले पेच, कंगोरे यांना तार्किकतेची जोड आवश्यक होती. प्रीतमची बहीण सपना हिचा नवरा मिलिंद आणि ती असे दोघंही बॉम्बस्फोटाच्या घटनेत मरतात. प्रीतमही त्या ट्रेनमध्ये असतो. त्यानं मििलदचा मृत्यू जवळून पाहिल्यानं त्यावर त्याचा विश्वास बसतो. परंतु सपनाचं काय झालं, हे त्याला तो शॉकमुळे कोमात गेल्यानं समजत नाही. जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा सपनाचं जाणं स्वीकारण्यास तो तयार होत नाही. तशात लागोपाठ दुसरा बॉम्बस्फोट होतो आणि तो आणखीनच कोसळतो. आपल्या हयात नसलेल्या विधवा बहिणीच्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीला लागतो. आपली पत्नी प्रेरणा हिलाच तो ‘सपना’ समजतो. त्यातून गुंता वाढत जातो.. आणि एका भयाण स्वप्नाचा प्रवास सुरू होतो.
लेखक संदीप जंगम आणि दिग्दर्शक शरद पोंक्षे यांनी नाटकाची हाताळणी सस्पेन्स थ्रिलरच्या अंगानं केल्यानं मोठाच घोळ झाला आहे. ज्या सार्वत्रिक बधीरतेबद्दल त्यांना भाष्य करायचंय, ते भाष्य शेवटी शेवटी येतं. पण ते शेरेबाजीच्या पलीकडे जात नाही. त्याआधी सपना आणि प्रीतम यांच्या नात्यातला घोळ ताण ताण ताणलेला आहे. नवरा बॉम्बस्फोटात गेल्यानं सपनाच्या मनावर परिणाम झाला आहे असं प्रीतमला वाटतं. तर प्रीतमवर बॉम्बस्फोटाच्या भीषणतेचा आघात झाल्यानं सपना त्याच्यावर मानसोपचार करू पाहते. या परस्परविरोधी द्वंद्वात जगत असताना दोघंही एकमेकांवर नजर ठेवून असतात. असं असताना सपनानं प्रीतमला कुलूपबंद करून नोकरीवर जाणं प्रीतम कसं सहन करतो? दुसरीकडे प्रीतम सतत ‘सपनाला कामावर पाठवणार नाही’ म्हणतो, परंतु प्रत्यक्षात ती त्याच्या समोरच कामावर जाते. पण तरीही तो काहीच रिअॅक्ट होत नाही. मग त्याच्या त्या म्हणण्याला काय अर्थ उरतो? मिलिंदच्या जाण्याचा सपनाला मोठा धक्का बसल्याचं प्रीतम एकीकडे म्हणत राहतो, परंतु त्याचा भिंतीवरचा फोटो काढून टाकून सपनाला त्याचा विसर पडावा म्हणून तो का प्रयत्न करीत नाही? वेडाच्या पातळीपर्यंत प्रीतम हिंसक बनत असताना प्रेरणा त्याच्याबद्दलचं वास्तव डॉक्टरांपासून का लपवते? प्रीतमच्या भासमय जगात त्याला ती का साथ देते? बरं, तो सपनाच्या जाण्याचा धक्का सहन करू शकणार नाही म्हणून ती त्याला याबाबतीत साथ देते, असं काही क्षण मान्य केलं तर मग प्रेरणाच्या अस्तित्वाचं, तिच्या भावभावनांचं काय? एक वेळ तिनं प्रीतमसमोर आपण सपना असल्याचं भासवणं वेगळं; परंतु डॉक्टरांनाही तिनं आपलं नाव ‘सपना’ असल्याचं सांगण्यामागचं प्रयोजन बिलकूलच समजू शकत नाही. नाटकात सस्पेन्स निर्माण करण्याची एक क्लृप्ती यापलीकडे या लपवण्याला नाटकात काहीच अर्थ नाही. आणि मिलिंदच्या फोटोच्या जागी मिलिंद व सपनाचा हार घातलेला फोटो लावल्यानं जर प्रीतम भासमय विश्वातून भानावर येत असेल तर ही गोष्ट सुरुवातीलाच नसती का करता आली? एकुणात लेखक आणि दिग्दर्शकही नसत्या ‘भासमय नाटका’च्या प्रेमात पडून चांगल्या वाटेनं जाऊ शकण्याची शक्यता असलेल्या या नाटकाला कात्रजचा घाट दाखवते झाले आहेत. दिग्दर्शक शरद पोंक्षे यांनी नाटकात चांगला सस्पेन्स निर्माण केला आहे. परंतु यातल्या नाटय़विषयाची ती जातकुळी नाही, हे मात्र त्यांच्या लक्षात आलेलं नाही. खटकेबाज संवादांबद्दलचं त्यांचं ऑब्सेशन लपून राहिलेलं नाही. यातही चमकदार संवादांच्या जागा त्यांनी जाणीवपूर्वक अधोरेखित केल्या आहेत. परंतु चमकदार संवाद म्हणजे नाटक नव्हे. संहितेतल्या त्रुटी व दोष, त्यांचा नाटकावर होणारा परिणाम याचा विचार झाल्याचं दिसत नाही.
अजय पुजारी यांनी उभं केलेलं घर नाटकाची मागणी पुरवणारं आहे. अशोक पत्की यांनी सस्पेन्स थ्रिलरचा टेम्पो वाढवणारं पाश्र्वसंगीत दिलं आहे. प्रेरणा कोसळून पडते त्या प्रसंगात वापरलेला आलापीचा तुकडा मात्र अनाठायी वाटतो. राजन ताम्हाणे यांनी प्रकाशयोजनेतून नाटय़पूर्णतेत भर घातली आहे. प्रोजेक्टरच्या साहाय्यानं घडल्या घटना दाखविण्याची युगत बॉम्बस्फोटाची भीषणता दाखविण्यासाठी उचित असली तरी शेवटी सपनाच्या भासमय विश्वात वावरणाऱ्या प्रीतमला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याचा केलेला वापर पाहताना त्यात सपना गेल्याचं प्रत्यक्षात दिसत नाही, असं असतानाही ती गेल्याचं प्रीतमला पटतं, हे आश्चर्यकारक आहे. केदार ओटवणेकर (रंगभूषा) आणि अश्विनी एकबोटे (वेशभूषा) यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.
शरद पोंक्षे यांनी वरकरणी नॉर्मल वागणारा, परंतु आतून कोसळलेला प्रीतम त्याच्या मनोरुग्णाईत छटेसह ठाशीवपणे साकारला आहे. विशेषत: तो जेव्हा हिंस्र होतो तेव्हा वेडाची एक छटा त्यांच्या अवघ्या व्यक्तिमत्त्वात जाणवते. अश्विनी एकबोटे यांनीही सपना तथा प्रेरणाची घालमेल, तिचं दुभंग व्यक्तित्व आणि त्यातली वेदना उत्कटतेनं दाखविली आहे. नाटकाचा सस्पेन्स थ्रिलरचा बाज घट्ट करण्यात त्यांच्या या अभिनयाचाही वाटा आहेच. सुचेत गवई आणि सचिन देशपांडे यांनीही छोटय़ा भूमिकांत मोलाची साथ केली आहे. शेवटच्या दृश्यात सगळ्या कोंडी फुटल्यावर हशा वसूल करण्यासाठी बाहेर जाता जाता डॉक्टरांचा असिस्टंट क्षणभर थांबतो आणि मिश्कील नजरेनं त्या दोघांकडे पाहतो. हे नाटकाच्या गंभीर शेवटाचा पार विचका करणारं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा