मुंबई : सुप्रसिद्ध जर्मन दिग्दर्शक विम वेंडर्स यांच्या जवळपास १६ चित्रपटांचा महोत्सव ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील रिगल सिनेमा येथे पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे. ‘विंग्स ऑफ डिझायर’ या १९८७ सालच्या चित्रपटाने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या चित्रपटाचा खेळ ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून खेळानंतर विम वेंडर्स चित्रपटाबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिल्म हेरिटेज फाऊंडेशन, विम वेंडर्स फाऊंडेशन आणि मॅक्सम्युलर भवन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. चित्रपट रसिकांना प्रत्येक खेळाला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक विम वेंडर्स स्वत: या महोत्सवात उपस्थित राहणार आहेत.

‘इटालियन नववास्तववाद’ आणि ‘फ्रेंच न्यू व्हेव’ या चळवळींच्या प्रभावाने १९६२ ते १९८२ मध्ये नवजर्मन सिनेमा या चळवळीचा उदय तत्कालीन पश्चिम जर्मनीत झाला. या चळवळीतील अनेक महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी विम वेंडर्स हे गणले जातात. ‘रोड मुव्ही’ या चित्रपट प्रकारात विम वेंडर्स यांनी तीन चित्रपट केले. या चित्रपटत्रयीमध्ये १९७४ साली ‘अॅलिस इन द सिटीज्’ हा पहिला चित्रपट असून दुसरा चित्रपट १९७५ सालचा ‘द राँग मुव्ह’ आणि तिसरा चित्रपट १९७६ प्रदर्शित झालेला ‘किंग्स ऑफ द रोड’ हा होय. ‘किंग्स ऑफ द रोड’ या चित्रपटाची १९७६ साली झालेल्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फीप्रेस्की’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटनेच्या पारितोषिकांसाठी ज्युरींनी एकमताने निवड केली होती. १९८४ साली झळकलेल्या ‘पॅरीस, टेक्सास’ या चित्रपटाने त्या वर्षीच्या ‘कान’ महोत्सवातील ‘पाम डी ओर’, ‘फीप्रेस्की’ ज्युरी अशी दोन्ही अव्वल पारितोषिके पटकावली होती. एकूण सोळा चित्रपटांमध्ये ‘ब्युएना व्हिस्टा सोशल क्लब’ हा १९९९ सालचा विम वेंडर्स यांचा माहितीपट असून तो क्युबामधील संगीत परंपरा यावरचा आहे. अमेरिकेच्या ‘नॅशनल फिल्म रजिस्ट्री’मध्ये या माहितीपटाचे जतन करण्यात आले आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सौंदर्यशास्त्रदृष्ट्या जगभरातील महत्त्वाचा माहितीपट म्हणून याचे जतन करण्यात आले आहे.

● पाच फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० ‘टोकियो-गा’, सहा फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता ‘रिव्हर्स अॅगल’, दुपारी ३ वाजता ‘द गोलीज् अँक्झायटी अॅट द पेनल्टी’, तर रात्री ९ वाजता ‘अलिस इन द सिटीज्’ हे चित्रपट पाहायला मिळतील.

● सात फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता विम वेंडर्स आणि निकोलस रे दिग्दर्शित ‘लाईटनिंग ओव्हर वॉटर’, दुपारी ३ वाजता ‘द स्टेट ऑफ थिंग्स’, सायंकाळी ६.३० वाजता ‘पॅरीस, टेक्सास’ (या खेळानंतर विम वेंडर्स यांच्याबरोबर प्रश्नोत्तरे), रात्री ९.३० वाजता ‘द अमेरिकन फ्रेंड’ या चित्रपटांचे खेळ होतील.

● आठ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता ‘डोण्ट कम नॉकिंग’, दुपारी ३ वाजता ‘ब्युएना व्हिस्टा सोशल क्लब’(या खेळानंतर विम वेंडर्स यांच्याबरोबर प्रश्नोत्तरे), सायंकाळी ६ वाजता ‘द एण्ड ऑफ व्हायोलन्स’, रात्री ९ वाजता ‘द मिलियन डॉलर हॉटेल’ हे चित्रपट पाहायला मिळतील.

● नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘किंग्ज ऑफ द रोड’ आणि दुपारी ३.३० वाजता ‘अण्टील द एण्ड ऑफ द वर्ल्ड’ (डायरेक्टर्स कट) हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.