दिग्दर्शक-अभिनेते आत्माराम भेंडे आणि लेखक-अभिनेते बबन प्रभू या दुकलीनं ‘फार्स’ हा पाश्चात्त्य नाटय़प्रकार मराठी रंगभूमीवर आणला आणि तुफान यशस्वी करून दाखवला. आत्माराम भेंडे यांना ‘फार्ससम्राट’ ही उपाधी त्यामुळेच प्राप्त झाली. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’सारखे फार्स प्रचंड लोकप्रिय झाले. खरं तर फार्स हा प्रकार सादर करायला तसा अवघड. कारण त्याकरता जी अभिनयशैली लागते ती सगळ्याच नटांना झेपत नाही. कॉमेडी आणि फार्स यांत फरक आहे हे बऱ्याच जणांच्या ध्यानी येत नाही. विशेषत: नाटय़तंत्राचं रीतसर प्रशिक्षण न घेतलेल्यांना त्यांतला भेद आकळणं अवघड जातं. त्यातून मग फार्स तोंडावर आपटतो.
वेद आणि विश्वस्मै प्रॉडक्शन या नाटय़संस्थांनी ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हा फार्स पुनश्च रंगभूमीवर आणला आहे. संतोष पवार यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. आणि अर्थात दिनूची प्रमुख भूमिकाही! फार्सची जाण असलेल्या नयना आपटे यात राधाबाईंच्या भूमिकेत आहेत, तर विनय येडेकर हे दिनूचे उचापती मित्र डॉ. नाय झालेत.
दिनूची अत्यंत खाष्ट सासू राधाबाई सहकुटुंब सरपरिवार आपल्या जावयाच्या- म्हणजे दिनूच्या घरी डेरेदाखल होतात. आणि दिनूच्या कौटुंबिक सुखात हलकल्लोळ माजतो. दिनूचा बेकार मेव्हणा रवी हा आधीच दिनूच्या घरी मुक्काम ठोकून असतो. त्याने हिरा नावाच्या तरुणीशी गुपचूप लग्न करून एका मुलाला जन्म दिलेला असतो. ते बाळ एका परिचित घरी ठेवून हिरा हीसुद्धा दिनूच्याच घरी मोलकरीण म्हणून वावरत असते. आईचा स्वभाव माहीत असल्याने रवीला आपल्या या लग्नाबद्दल आणि बाळाबद्दल घरी काही सांगणं शक्यच नसतं. दिनू आणि मीनालाही (दिनूची पत्नी) ही गोष्ट ठाऊक नसते. तशात दिनूच्या सासूबाई राधाबाई या आपले यजमान कन्हैया आणि नटी बनण्याच्या वेडानं पछाडलेली मुलगी प्रीतीसह दिनूच्या घरी मुक्कामाला येते. स्वाभाविकच दिनूच्या घराचा आता आखाडा होणार, हे ठरलेलंच. नवऱ्याला आपल्या जरबेत कसं ठेवावं याचे धडे राधाबाई मीनाला देतात. तर दिनूला आपल्या सासूबाईंचं कर्तृक ज्ञात असल्याने कधी एकदा ही ब्याद आपल्या घरातून घालवून देतो असं त्याला झालेलं. त्याकरता तो आपला रिकामटेकडा, पण उचापतखोर मित्र डॉ. नाय याची मदत घेतो. हरहुन्नरी डॉ. नायच्या शब्दकोशात ‘नाय’ हा शब्दच नसतो. प्रीतीला अभिनयाचे धडे देण्यासाठी तो मेनकादेवी नामक एका जुन्या नटीला दिनूच्या घरी बोलावतो. राधाबाईंना हाकलून देण्यासाठी तो शक्कल लढवतो.
राधाबाईंचे पतिराज कन्हैय्या यांना राधाबाईंच्या लेखी पायपुसण्यादेखील किंमत नसते. बायकोपुढे लाचार कन्हैय्या तिच्या परोक्ष मात्र खूप बढाया मारतात. पण बायको समोर येताच त्यांचं गरीब मांजर होतं.
याच वेळी रवीच्या बाळाला सांभाळणाऱ्या परिचित बाई स्थलांतर करणार असल्याने त्याला बाळाला घेऊन जायला सांगतात. पण बाळाला घरी घेऊन यायचं म्हणजे आपलं भांडं फुटणार.. या चिंतेत रवी आणि मोलकरीण हिरा! पण बाळाला आणण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायही नसतो. बाळाला घरी आणलं तर जातं; पण ते कुणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून त्याला दिनूच्या गॅरेजमध्ये ठेवलं जातं. दिनूला सासऱ्यांनी दिलेला तुटका ऑर्गन सासूला घरातून हाकलण्यासाठी म्हणून दिनू त्याच वेळी गॅरेजमध्ये आणून ठेवतो. डॉ. नाय तो दुरुस्त करतो. ऑर्गनचा विलक्षण तिटकारा असलेल्या राधाबाईंना तो घरात आणून हाकलून देता येईल या खुशीत गाजरं खात असलेल्या दिनूसमोर अकस्मात भलतंच संकट उभं राहतं.
ते काय, ते नाटकात पाहणचं योग्य.
अशी सगळी एकापेक्षा एक ‘नग’ माणसं एकाच छताखाली आल्यावर त्यांच्या उचापत्यांनी नस्ते प्रसंग ओढवणार, हे ठरलेलंच. त्याचंच नाटय़रूप म्हणजे ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’!
दिग्दर्शक संतोष पवार यांनी नाटक काळानुरूप बदलण्यासाठी मूळ संहितेत काही बदल केले आहेत. काही नवे प्रसंग त्यात रचले आहेत. तसंच मूळच्या अप्रत्यक्ष गोष्टीही साक्षात सादर केल्या आहेत. परंतु हे करत असताना फार्सचं कॉमेडीत कधी रूपांतर झालं, हे त्यांचं त्यांनाच कळलेलं नाही. मूळ नाटकाचं हे नवं रूपही रंजक असलं तरी फार्सची गंमत त्यात उणावली आहे. परिस्थितीजन्य विनोदाची जागा शाब्दिक विनोदाने घेतली आहे. ज्यावर संतोष पवारांची हुकुमत आहे. अशा जागा त्यांनी छान काढल्या आहेत. चित्रविचित्र पात्रं, त्यांच्या स्वभावगत लकबी, त्यांच्या कृती यांतून नाटक सतत हलतं राहील याची दक्षता त्यांनी घेतली आहे. परंतु प्रत्येक प्रवेशाचा शेवट काटेकोरपणे केला गेला असता तर मधल्या ‘रिक्त’ जागा खटकल्या नसत्या.
प्रसाद वालावलकरांनी दिनूच्या घराची केलेली रचना नाटकाची मागणी पुरवणारी आहे. किशोर इंगळेंची प्रकाशयोजना आणि साई-पियुष यांचं पाश्र्वसंगीत आवश्यक ते नाटय़ उभं करते.
संतोष पवार यांनी दिनूच्या भूमिकेत आपल्या पद्धतीनं फुल्ल बॅटिंग केली आहे. विनोदाचं अचूक टायमिंग कसं साधायचं यावर त्यांची हुकुमत आहे. ते वापरून ते नाटकावर ‘हावी’ होतात. डॉ. नाय झालेल्या विनय येडेकरांनी आपल्या वाटय़ाचे हशे वसूल केले आहेत. नयना आपटे (राधाबाई) यांचा तारस्वर काही वेळा कर्कश्शतेकडे झुकतो. उठसूट खाष्टपणा करणारी ही सासू पुढे अर्थविहीन वाटू लागते. नटी होण्याच्या वेडानं भरकटलेली प्रीती- ऋतुंधरा माने यांनी उत्तम साकारली आहे. इरावती लागू यांनी जुन्या काळची अभिनेत्री मेनकादेवी रंगवताना अर्कचित्रात्मक शैली स्वीकारली आहे. विलास देसाई (कन्हैय्या), रोनक शिंदे (रवी), दीपश्री कवळे (हिरा) यांनी आपल्या भूमिका चोख वठवल्या आहेत.