‘चष्मेबद्दूर’, ‘साथ साथ’ यासारख्या निखळ आनंददायी चित्रपटांमधून लोकप्रिय झालेली फारूख शेख आणि दीप्ती नवल यांची जोडी इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘लिसन अमया’ या चित्रपटात फारूख, दीप्ती नवल पुन्हा एकदा नायक-नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीप्ती नवलने मधल्या काळात निवडक चित्रपटांमधून काम केले आहे. फारूख मात्र मधल्या काळात चित्रपटांपासून लांबच आहे.  ‘लिसन अमया’ची कथा, दीप्ती नवल आणि नवोदित दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा मला नेहमी आलेला चांगला अनुभव या तीन गोष्टींमुळे मी हा चित्रपट करण्यासाठी होकार दिल्याचे फारूख शेखने सांगितले. साठीतील छायाचित्रकार आणि एक मध्यमवयीन विधवा यांच्या प्रेमाची कथा सांगणारा हा चित्रपट आहे. अर्थातच फारूखने छायाचित्रकाराची भूमिका केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संवाद साधताना, आजच्या चित्रपटांचे वय फारच कमी असल्याचे मत फारूखने मांडले. पूर्वी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कितीतरी आठवडे तो चित्रपटगृहांमध्ये असायचा. रौप्यमहोत्सवी, सुवर्णमहोत्सवी आठवडे साजरे केले जायचे. आत्ताचे चित्रपट तांत्रिकदृष्टय़ा त्यावेळपेक्षा शंभरपटीने चांगले आहेत, आर्थिकदृष्टय़ा पन्नासपटीने आणि प्रेक्षकांची संख्या पाहता काळाच्या दोनशे पावले पुढे आहेत. आणि तरीही प्रदर्शित झाल्यापासून तीन दिवसांत त्याचा निकाल लागतो. नफा-तोटा जे असेल ते तीन दिवसांत हातात येते. त्यातही चित्रपटाची कथा-पटकथा लिहिणाऱ्यांना या यशात अजिबात स्थान नाही, असे आपले मत असल्याचे फारूखने सांगितले.  हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचेही त्याचे म्हणणे आहे. सध्याच्या काळात विविध प्रकारच्या, आशयाच्या चित्रपटांना जागा आहे आणि वेगळा चित्रपट करू पाहणारे तंत्रज्ञ-दिग्दर्शकही इथे आहेत. नवीन दिग्दर्शक आपल्या जीव ओतून काम करतात हा माझा अनुभव आहे. ‘लिसन अमया’चा दिग्दर्शक अविनाशही नवीनच आहे म्हणूनच या चित्रपटाला होकार दिल्याचे फारूखने सांगितले.

Story img Loader