फिफा विश्वचषक, जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक, कतारमध्ये आजपासून सुरू होणार आहे. फुटबॉल विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेच्या देशात आयोजित केला जात आहे. तसेच फिफा विश्वचषक प्रथमच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात खेळवला जात आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण ३२ देशांचे संघ सहभागी होत आहेत. नुकतंच या खेळाचा भव्य उद्घाटन सोहळा सुरू झाला असून साऱ्या जगभरात तो लाईव्ह दाखवला जात आहे.
जगभरातील वेगवेगळ्या सेलिब्रिटीजनी यात हजेरी लावली आहे. हॉलिवूड स्टार मॉर्गन फ्रीमन यांच्या एका नाट्यरूपी भाषणाने या सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर कतारमधील वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती या सोहळ्यात बघायला मिळाली. तब्बल १ वर्षं या सोहळ्याची तयारी सुरू होती. कतारची जनता आणि एकूणच फुटबॉलचे चाहते यासाठी चांगलेच उत्सुक होते.
फुटबॉल वर्ल्डकपप्रमाणेच त्यांची थीम सॉन्गसुद्धा चांगलीच लोकप्रिय असतात. यावर्षीच्या वर्ल्डकपचं अधिकृत गाणं ‘लाइट द स्काय’ या गाण्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची झलक पाहायला मिळते. पण यावर्षीच्या उद्घाटन सोहळ्यात हॉलिवूडची लोकप्रिय गायिका शकिरादेखील हजेरी लावणार अशी चर्चा होती. शकिरा या कार्यक्रमात हजर नसली तरी तिच्या २०१० च्या ‘वाका वाका’ या गाण्याची मात्र झलक आपल्याला ऐकायला मिळाली. शिवाय K’naan च्या ‘Wavin’flag’ या २००९ सालच्या लोकप्रिय फिफा सॉन्गचीही झलक या सोहळ्यात ऐकायला मिळाली.
या दोन्ही गाण्यांची धुन आणि शब्द कानावर पडताच सगळे चाहते जुन्या आठवणींमध्ये रमले. ही गाणी आजही कित्येकांची आजही आवडती आहेत, त्यामुळे ही गाणी पुन्हा फुटबॉलच्या वर्ल्ड कप दरम्यान कानावर पडणं ही फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणीच होती. कतार येथे पार पडणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्या निमंत्रणावरून धनखर २०-२१ नोव्हेंबर रोजी कतारला भेट देतील.