‘नशीबवान’, ‘भाई’ यांसारख्या मराठी चित्रपटांना चित्रपटगृह किंवा स्क्रीन उपलब्ध न होण्याचं प्रकार ताजे असताना आता आणखी एका मराठी चित्रपटाची परवड झाली आहे. अॅक्शनपट आणि बिग बजेट असणारा ‘फाईट’ चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला मात्र या चित्रपटाच्या नशीबीही इतर मराठी चित्रपटांसारखी उपेक्षाच आली आहे. ३०० हून जास्त स्क्रीनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल असे दीवा स्वप्न दाखवण्यात आल्यानंतर या चित्रपटाच्या वाट्याला केवळ १२ स्क्रीन आल्या असल्याचा आरोप निर्माते ललित ओसवाल यांनी केला आहे. महाराष्ट्रात अशीच मराठी चित्रपटांची अवस्था राहिली तर मराठी निर्मात्याला आत्महत्या करावी लागेल असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
‘मराठी चित्रपट सृष्टीत असणारे ढिसाळ वितरण व्यवस्थापन आणि वितरक याचा मोठा फटका चित्रपटाला आणि निर्मात्याला बसतो. मल्टीफ्लेक्स मालकांची दिवसेंदिवस वाढत चाललेली दादागिरी, अमराठी चित्रपटांना मिळणारं स्थान आणि मराठी चित्रपटांच्या पदरात येणारी उपेक्षा यामुळे निर्मात्यांना कोट्यवधी रुपयाचं नुकसान सहन करावं लागतं. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची आणि निर्मात्यांची होणारी ही दयनीय अवस्था वारंवार अस्वथ करणारी आहे’, असं म्हणत ओसवाल यांनी आपली खंत व्यक्त केली.
कमनशिबी ! भाऊ कदमच्या चित्रपटाला मिळेना थिएटर
‘अनेकदा मराठी चित्रपटांना स्क्रीन नाकारली जाते. अडचणीच्या वेळी कोणतीही शासकीय यंत्रणा, पक्ष, नेता चित्रपट निर्मात्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत नाही. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह का मिळत नाही? असा जाब चित्रपटगृहाच्या मालकाला ठणकावून का विचाराला जात नाही असाही सवाल त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी तसेच चित्रपटगृह मिळवण्यासाठी मराठी चित्रपटांना व निर्मात्यांना वणवण का करावी लागते. हे जर असंच चालू राहिलं तर शेतकरी आत्महत्या करतो त्याप्रमाणे निर्मात्याला आत्महत्या करायची वेळ दूर राहिली नाही’ असंही ते म्हणाले.
११ जानेवारीला फाईट प्रदर्शित झाला होता मात्र सोमवार दि. १४ जानेवारीलाच या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यात आलं असं ओसवाल यांचं म्हणणं आहे. यापूर्वी भाऊ कदम, महेश मांजरेकर यांनी देखील महाराष्ट्रात मराठी चित्रपटांच्या वाट्याला येणाऱ्या उपेक्षेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.