तुम्ही एखादा चित्रपट मोठ्या अपेक्षेने चित्रपटगृहात पाहण्यासाठी गेला आहात. पण त्यावेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तुम्हाला अर्धाच चित्रपट दाखवला जातो. यामुळे नक्कीच तुम्हाला निराशाजनक स्थितीचा अनुभव येऊ शकतो. चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांना अमेरिकेतील सिनेमार्क नॉर्थ हॉलिवूड येथे असाच एक अनुभव आला आहे. नुकतंच त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ हा चित्रपट २५ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे राजमौली पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच अनेक चाहत्यांना ‘आरआरआर’ चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली.
चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांनीही अमेरिकेतील एका चित्रपटगृहात जाऊन आरआरआर हा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील सिनेमार्क नॉर्थ हॉलिवूड या चित्रपटगृहात त्यांनी हा चित्रपट पाहिला. मात्र यावेळी एक धक्कादायक घटना घडली. याबाबत ट्विट करत त्यांनी सांगितले आहे.
अनुपमा चोप्रा यांनी ट्विट करत म्हटले की, हे पहिल्यांदाच घडले आहे! सिनेमार्क नॉर्थ हॉलिवूड. आम्ही RRR च्या फर्स्ट डे first day first show साठी गेलो होतो. तिथे आम्ही चित्रपटाचा पहिला भाग पाहिला. पण आम्हाला दुसरा भाग पाहता आला नाही. कारण त्या चित्रपटगृहाने चित्रपटाचा दुसरा भाग घेतलाच नव्हता. याबाबत आम्ही व्यवस्थापकांना विचारले असता ते म्हणाले, आम्हाला याबाबत काहीही सूचना मिळालेल्या नाहीत. हे सर्व अविश्वसनीय आणि निराशाजनक आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटातील ‘भारतीय’ हा शब्दही ज्या संदर्भाने वापरण्यात आला होता तोही या संवादातूनही काढून टाकण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या या ट्विटनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
“महिलांना सेक्ससाठी विचारणे MeToo असेल तर…”, प्रसिद्ध अभिनेत्याच्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ
दरम्यान आरआरआर या चित्रपटात राम चरण, ज्यूनियर एनटीआर, अजय देवगण, आलिया भट्ट झळकत आहेत. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे आलिया नव्हे तर अजय देवगणचा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट आहे.