सध्या चित्रपटांपेक्षा त्यांचे रिव्यूज प्रचंड चालतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेट आल्याने सोशल मीडिया प्रत्येक व्यक्ती एखादा चित्रपट बघितला की त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत असते. यांच्याबरोबरच बरीच मीडिया हाऊस तसेच युट्यूब चॅनल्ससुद्धा या शर्यतीत आपल्याला बघायला मिळतात. सध्या इंटरनेटवर तर चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या अगदी काही तासांतच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात होतात.
बऱ्याचदा चित्रपटगृहाच्या बाहेर हे पत्रकार मंडळी किंवा युट्यूब चॅनलवाले हे प्रेक्षकांची प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्ड करतात आणि काहीच क्षणात या प्रतिक्रिया इंटरनेटवर व्हायरल होतात. काहीलोक तर चित्रपटगृहाच्या आवारातच पूर्णपणे चित्रपटाचा रिव्यू शूट करतात. यामुळे बऱ्याचदा चित्रपटांच्या बिझनेसवर परिणाम होताना दिसतो. यासाठीच ‘फिल्म एक्झिबिटर्स युनायटेड ऑर्गनायझेशन ऑफ केरळ’ (FEUOAK) या संस्थेने काही ठोस पावलं उचलायचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा : अक्षय कुमार करतोय २५ वर्षांनी लहान मृणाल ठाकूरसह रोमान्स; नेटकऱ्यांनी केलं पुन्हा ट्रोल
या संस्थेचे अध्यक्ष के. विजयकुमार यांनी याबद्दल नुकतंच स्पष्टीकरण दिलं आहे. चित्रपटगृहाच्या आवारात कोणत्याही मीडियाशी संबंधीत व्यक्तीला रिव्यू शूट करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. किमान केरळमध्ये तरी हा नियम लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याविषयी के विजयकुमार म्हणाले, “प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेण्याच्या हेतूने येणाऱ्या सर्व मीडियाशी संबंधीत लोकांना यापुढे केरळमधील चित्रपटगृहांच्या आवारात प्रवेश नाकारण्यात येणार आहे. यापैकी काही रिव्यूज हे एकांगी असतात आणि केवळ ठराविक वर्गासाठी ते घेतले जातात, आणि हे चित्रपटासाठी घातक आहे. यासंदर्भात एक नोटिस आधीच आम्ही सर चित्रपटगृहांच्या मालकांना जारी केली आहे. युट्यूब रिव्यू करणाऱ्या लोकांसंदर्भात अजून निर्णय व्हायचा आहे.”
या प्रतिक्रियांमुळे चित्रपट निर्मात्यांना प्रचंड नुकसान होत असल्यामुळे त्यांनी या संस्थेकडे ही विनंती केल्याचं स्पष्ट झालं आहे. अशीच कारवाई तामिळनाडू सरकारनेदेखील केली होती. FEUOAK या संस्थेने नुकतंच चित्रपटांच्या ओटीटी रिलीजबद्दलसुद्धा एक निर्णय जाहीर केला. कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ४२ दिवसांनीच तो ओटीटीवर प्रदर्शित करता येईल, हा निर्णय नुकताच त्यांनी घेतला होता ज्याचं भरपूर कौतुकही झालं होतं.