भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाली आणि या निमित्ताने माझा सत्कार होत आहे. त्यामुळे आजचा दिवस आनंदाचा आहे. दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर, अशोक कुमार यांच्यासारखे चांगले कलावंत व दिग्दर्शक यांच्यासह मला काम करण्याची संधी मिळाली. अलिकडचे शाहरूख व आमीर या दोघांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटसृष्टीने मला नाव आणि पैसा मिळवून दिला. तुम्हा रसिकांचे मला भरपूर प्रेम मिळाले. म्हणूनच चित्रपटसृष्टी हे माझे कुटुंब असल्याची भावना मनीं दाटून येते, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांनी काढले. प्रभात चित्रमंडळातर्फे सिनेमाशताब्दीनिमित्त अभिनेत्री शशिकला यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
प्रभात चित्रमंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटांच्या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी रवींद्र नाटय़ मंदिर, मिनी थिएटर येथे झाले. शशिकला आणि अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रभात चित्रमंडळाचे अध्यक्ष किरण शांताराम, सरचिटणीस संतोष पाठारे, ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी, दिनकर गांगल, जयंत धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदी आणि उर्दू यांचे मिश्रण असलेल्या ‘हिंदुस्थानी’ भाषा हिंदी चित्रपटांत वापरली जाते. ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांनी या हिंदुस्थानी भाषेवर प्रभुत्त्व मिळवून हिंदी चित्रपटांत आपला असा खास ठसा उमटवला आहे. त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण शैलीचे अनुकरण पुढे अनेक अभिनेत्रींनी केले, असे पिळगांवकर म्हणाले.
प्रभात चित्रमंडळातर्फे आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवाची सुरुवात रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘इन्व्हेस्टमेंट’ या चित्रपटाने झाली. या निमित्ताने रत्नाकर मतकरी यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच राजेंद्र ओझा यांनी संकलित केलेल्या चित्रपट विषयक तीन इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशनही शशिकला, किरण शांताराम आणि सचिन यांच्या हस्ते करण्यात आले.

Story img Loader