१८ जून १९८३चा दिवस.. भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरले. हा दिवस भारतीय क्रिकेट रसिक अजूनही जगतो आहे. या स्पर्धेतील भारताचा प्रत्येक सामना मोठय़ा पडद्यावर पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळणार आहे. १९८३च्या भारताच्या विश्वचषक विजेतेपदाच्या प्रवासावर एक चित्रपट येऊ घातला असून त्यामुळे ही संधी रसिकांना मिळणार आहे. लाहोर या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय पुरण सिंग चौहान १९८३च्या विश्वचषकावर चित्रपट काढत आहेत.
” या मोठ्या विजयाचे साक्षीदार असलेल्या खेळांडूकडून मी १९८३ विश्वचषकाबाबत माहिती मिळवत आहे. पण, ही गोष्ट ३१ वर्षांपूर्वी घडली आहे आणि आता गोष्टी बदलल्या आहेत. त्यावेळचे तंत्रज्ञान इतके विकसित नव्हते. त्यामुळे मला भरपूर संशोधन करावे लागणार आहे आणि मी क्रिकेटपटू कपिल देव (त्यावेळचे भारतीय संघाचे कर्णधार) आणि बलविंदर सिंग यांच्याकडून माहिती मिळवत आहे. तसेच, काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही भेट देण्याचा माझा विचार आहे. कारण, १९८३च्या विश्वचषक स्पर्धेआधी भारताला कोणीच संभाव्य विजेते मानत नव्हते. मात्र त्यांनी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज या दिग्गजांना नमवत विश्वचषकावर आपले नाव कोरले. असे संजय चौहान म्हणाले. १९८३ असे या चित्रपटाचे तात्पुरते शिर्षक ठरविण्यात आले असून याची स्क्रिप्ट आणि कलाकारांची निवड झाल्यावर चित्रीकरणास सप्टेंबरमध्ये सुरुवात करण्यात येणार आहे.
हा थरार प्रत्यक्ष पडद्यावर दाखवण्यासाठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे संस्थापक-अध्यक्ष विष्णुवर्धन इंदुरी यांनी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे स्पर्धेदरम्यान खेळवल्या गेलेल्या मैदानांवरच चित्रपटातील सर्व सामन्यांचे चित्रिकरण होणार आहे. ज्या स्पर्धेनंतर भारतात क्रिकेट या खेळाला बाळसे चढले, त्या स्पर्धेत भारताने विजेतेपद कसे पटकावले, हे मोठय़ा पडद्यावर बघणे नक्कीच मनोरंजक असेल.

Story img Loader