इंदिरा गांधींची हत्या आणि त्यानंतर दिल्लीत पसरलेली एकच दंगल, हल्लकल्लोळ या परिस्थितीत तिथे आजूबाजूला असणाऱ्या अनेक लोकांच्या आयुष्यात त्या घटनेचे विचित्र पडसाद उमटले. अनेकांच्या आयुष्याची वाताहत झाली तर कित्येक जण त्याही परिस्थितीत बचावले. ‘३१ ऑक्टोबर’ १९८४ ची ती रात्र काही जणांच्या आयुष्यात वेगवेगळ्या अर्थाने कोरली गेली. त्याच रात्री दंगलीत सापडलेल्यांपैकी एका शीख कुटुंबाची खरी कहाणी सांगणारा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केला आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर ‘लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये होणार आहे. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन शीख सुरक्षारक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर दिल्लीत मोठी दंगल उसळली. दिल्ली आणि अनेक ठिकाणी शेकडो शिखांची हत्या करण्यात आली. त्या रात्री दंगलीतून बचावलेल्या एका शीख कुटुंबीयांची वास्तव कहाणी ‘३१ ऑक्टोबर’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. सोहा अली खान आणि विनोदी अभिनेता वीर दास यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी के ले असून त्यांचा हा पहिलाच हिंदूी चित्रपट आहे. अत्यंत वेगळी कथा आणि मांडणी असणारा हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित व्हावा, यासाठी निर्माते-दिग्दर्शक प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून लंडनमध्ये या महिन्यात होणाऱ्या ‘लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाचा जागतिक प्रीमिअर होणार आहे.

‘धग’ या पहिल्याच चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या शिवाजी लोटन पाटील यांच्याकडे ही खरी कथा आली आणि त्यांनी लगेचच या चित्रपटावर काम सुरू केले होते. सोहा अली खान आणि वीर दास ही आत्तापर्यंत पडद्यावर एकत्र न आलेली जोडी या चित्रपटात दिसणार आहे.  केवळ पाश्र्वसंगीताचा वापर चित्रपटात करण्यात आला असून त्यासाठी आशा भोसले, सोनू निगम, जावेद अली आणि उस्ताद गुलाम मुस्तफा अली खान यांनी या संगीतासाठी आपला आवाज दिला आहे. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांनी पाहावा, यासाठी निर्माते हॅरी सचदेवा आग्रही होते. ‘लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये होणाऱ्या प्रीमिअरमुळे हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना पाहता येईल. मात्र, या महोत्सवाबरोबरच अमेरिका, कॅ नडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दुबई येथेही हा चित्रपट पोहोचावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

 

Story img Loader