काही चित्रपट आपल्याला आनंद देतात, काही विचार करायला भाग पाडतात, तर काही रहस्यात गुरफटवून ठेवतात. ‘अकल्पित’ हा चित्रपट रहस्यमय आणि गूढ प्रकारातील चित्रपटात मोडतो. शेर्लोक होल्म्सच्या रहस्यकथांची झलक या चित्रपटात पाहायला मिळते.
चित्रपटाची कथा घडते ती ‘खुळवड’ या गावातील फार्म हाउसवर. व्यवसायात लागोपाठापाठ तोटा सहन करत असलेला मिलिंद एक बिझनेस डील उरकून पत्नी श्वेतासोबत मुंबईला परतत असताना वाटेत मिलिंदला त्याचा चुलत भाऊ विशाल भेटतो. विशालच्या आग्रहाखातर मिलिंद आणि श्वेता त्याच्या खुळवड येथील फार्म हाउसवर जातात. आधीच ठरलेल्या कटाप्रमाणे फार्म हाउसवर पोहोचताच श्वेता आणि विशाल मिलिंदला मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही कारणास्तव ते त्याला मारण्यात असफल ठरतात. श्वेताने पाचारण केलेला कॉन्ट्रॅक्ट कीलर राज आणि एका अनोळखी राजच्या आगमनाने संपूर्ण चित्रपटाला नाटयमय कलाटणी मिळते. या सर्व घटनेत श्वेता, विशाल आणि दोघांपैकी एका राजचा खून होतो. या सर्व खुनांचा आळ मिलिंदवर येतो. पण तो मानसिकदृष्ट्या स्थिर नसून त्याला त्या रात्री काय घडले, हे आठवत नसल्याचे त्याच्या वकिलांचे म्हणणे असते. परंतु, तुरुंगाच असलेल्या मिलिंदला पाच वर्षानंतर अचानक सर्व काही आठवू लागते आणि आपण निर्दोष असून, हे तिन्ही खून आपण केले नसून खुळवड येथील सिरीयल कीलर किंवा दुस-या राजने केल्याचा दावा तो करतो. हे तिन्ही खून कोणी केले आणि खरंच कोण सिरीयल किलर आहे? मिलिंदची खुनाच्या आरोपातून सुटका होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी चित्रपट पाहणे गरजेचे ठरते.
चित्रपटात एकाच गाण्याचा समावेश करण्यात आला असून, त्याचे शब्दांकन गुरु ठाकूर याने केले आहे. परिक्रमा बॅण्डने या गाण्यास संगीत दिले असून, १९९१ पासून हा बॅण्ड कार्यरत आहे. जरी हे गाणे हिंदीतून असले, तरी ऐकण्याजोगे आहे. सौरभ भालेराव पार्श्वसंगीत देण्यात काही प्रमाणात कमी पडला आहे. काही दृष्यांमध्ये पार्श्वसंगीताची कमतरता जाणवते. त्यामुळे चित्रपटात थरार जाणवत नाही. चित्रपटाची मांडणी करण्याचे कसब हे दिग्दर्शकाचे असते. पदार्पणातच दिग्दर्शक प्रसाद आचरेकर यांनी चांगला प्रयत्न केला आहे. निर्मिती सावंत, रेणुका शहाणे आणि मोहन आगाशे या प्रस्थापित कलाकारांचा अभिनय वगळता नवोदित कलाकारांचे प्रयत्न कुठेतरी कमी पडल्याचे जाणवते. लेखकाने या चित्रपटातले रहस्य अधिक गूढ व्हावे, यावर भर दिला आहे. मात्र, चित्रपटाचा शेवट पाहताना लेखक नक्कीच कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. चित्रपटाचा शेवट परिणामकारक न झाल्याने प्रेक्षक गोंधळलेल्या मनःस्थितीत चित्रपटगृहाबाहेर पडण्याची शक्यता वाटते…
“अकल्पित”
निर्माता – हर्षल उशिर आणि प्रसाद उगले
कथा आणि दिग्दर्शन – प्रसाद आचरेकर
संगीत – परिक्रमा बॅण्ड
छायांकन- अमित काडोठ, निशांक माथुर
कलावंत – मोहन आगाशे, निर्मिती सावंत, रेणुका शहाणे, अतुल तोडणकर, संदेश जाधव, अभिनय सावंत, रुतुल पाटील, आशुतोष पत्की, सुमेध गायकवाड, सचिन शिंदे