ब्रॅण्ड सलमान खानचा नवीन सिनेमा म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमातही ब्रॅण्ड सलमान दिसत असला तरी गेल्या काही वर्षांतील त्याच्या सिनेमांहून सलमानचा निश्चितच वेगळा बाज यात पाहायला मिळतो. सिनेमा म्हणजे ‘एण्टरटेन्मेंट एण्टरटेन्मेंट एण्टरटेन्मेंट’ हा जो पॉप्युलर डायलॉग आहे त्यानुसार बिनडोक, तर्कविसंगत करमणूक सलमान खानच्या या सिनेमातही आहेच. परंतु, सलमानचा ‘बीईंग ह्य़ूमन’ ब्रॅण्डचा ‘फेस’ अधिक मोठा करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिग्दर्शक कबीर खान आणि चित्रपटकर्त्यांनी केला आहे हे नजरेआड करून चालणार नाही. सलमान खानची प्रतिमा त्याच्या चाहत्यांमध्ये अधिक ठसविण्याचा स्पष्ट प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे. अर्थात भरपूर एण्टरटेन्मेंट सिनेमात आहे. नेहमीप्रमाणे हा सिनेमा फक्त सलमान खानच्या चाहत्यांसाठीच बनविला आहे.
भारत-पाकमधील क्रिकेटची मॅच, त्या मॅचवरून उभय देशांमधील क्रिकेट रसिक आपली तथाकथित देशभक्ती व्यक्त करण्याची संधी घेतात. याच प्रकारची संधी दिग्दर्शक-निर्मात्यांनी या सिनेमाद्वारे शोधली आहे. हिंदी सिनेमामध्ये ‘कमर्शियल देशभक्ती’ प्रमाणेच ‘हिंदु-मुस्लिम ऐक्य’, भारत-पाक मैत्री आणि उभय देशांतील लोकांच्या भावनांवर आधारित सिनेमांचे प्रयत्न खूप झाले आहेत. ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमात त्याचीच री ओढण्याचा प्रभावी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
सलमान खान म्हणजे सुपर अॅक्शन, पानचट-फुसके पण प्रेक्षकांना हसू आणणारे विनोद याला छेद देऊन त्याची प्रतिमा साधी-सरळ, गरीब कॉमन मॅनची दाखवितानाच सलमानभाय बजरंगबलीचा निस्सीम भक्त दाखविला आहे. हिंदु-मुस्लिम दोन्ही चाहत्यांना-प्रेक्षकांना सलमान खानची ‘माणूसकी’ सिनेमातून दाखविण्याचा प्रयत्न ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा करतो.
गोष्ट एकदम टीपिकल आहे. एक लहान मुलगी पाकिस्तानातून भारतात आईबरोबर मशिदीला भेट देण्यासाठी येते. ‘मन्नत’ मागून झाल्यावर समझौता एक्स्प्रेसने पुन्हा पाकिस्तानला जाताना मुलगी हरवते आणि भारतातच राहते. भरीस भर म्हणून आणि प्रेक्षकांची सहानुभूती मिळावी म्हणून ही पाच-सहा वर्षांची गोड दिसणारी चिमुरडी मुकी दाखवली आहे. तर आई रेल्वेने पाकिस्तानात निघून गेल्यावर ही चिमुरडी दुसऱया मालगाडीत चढते आणि फिरत फिरत बजरंगी ऊर्फ पवन चतुर्वेदीला भेटते. मग या मुक्या मुलीला बजरंगी पवन ‘मुन्नी’ असे नाव देतो आणि त्याला जेव्हा समजते की ही पाकिस्तानातून इथे आली आहे तेव्हा तिला तिच्या मायदेशी स्वत: पोहोचविण्याचे ठरवितो. मुन्नीला तिच्या आई-वडिलांकडे पाकिस्तानात पोहोचवेपर्यंतचा प्रवास सिनेमात दाखविला आहे.
हिंदु-मुस्लिम प्रतीकांचा वापर आणि त्यातील साम्य आणि भेद दाखवत माणूसकी नेहमीच श्रेष्ठ असते, धर्माच्या पलिकडे जाणारी असते हे याचप्रकारच्या असंख्य हिंदी सिनेमांनी दाखविलेले पुन्हा या सिनेमातून दाखवून ‘ब्रॅण्ड सलमान’ अधिक ‘इमोशनल’ केला आहे. सलमानच्या निस्सीम चाहत्यांसाठी असलेल्या या सिनेमाची तुलना सलमानच्या ‘बॉडीगार्ड’, ‘जय हो’, ‘किक’ या सिनेमांशी केली तर त्या सिनेमांमधील त्याच्या प्रतिमेहून वेगळा असा एका नव्या इमेजसह सलमान ‘बजरंगी भाईजान’ म्हणून पडद्यावर दिसतो. लेखक-दिग्दर्शकांनी खुबीने साकारलेली पटकथा हेच या सिनेमाचे यश आहे. विशेष म्हणजे या सिनेमाला एक सरळ कथा आहे.
निस्सीम हनुमान भक्त असल्यामुळे पवन चतुर्वेदी ऊर्फ बजरंगी माकड दिसले तरी त्याला आदराने नमस्कार करत ‘जय श्रीराम’ म्हणतो तेव्हा सलमानचाहत्यांना शिट्टय़ा वाजवल्याशिवाय चैन पडत नाही. आधीच्या काही चित्रपटांच्या तुलनेत या सिनेमात सलमान खान ‘बेअर बॉडी’ अजिबात दाखविलेला नाही, त्याचबरोबर खूप ‘सिली जोक्स’ही नाहीत, सलमानचे अॅक्शन सीक्वेन्स अगदी कमी आहेत. त्यामुळे निस्सीम सलमानचाहत्यांची किंचित निराशा होऊ शकते. परंतु, सलमानचा ‘इमोशनल कोशन्ट’ दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्यामुळे ‘ब्रॅण्ड सलमान’ची प्रतिमा त्याच्या चाहत्यांच्या मनात अधिक उंचावणारा हा सिनेमा निश्चितच आहे.
फिल्म रिव्ह्यू : इमोशनल ‘बजरंगी भाईजान’
सलमान खानची प्रतिमा त्याच्या चाहत्यांमध्ये अधिक ठसविण्याचा स्पष्ट प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे. अर्थात भरपूर एण्टरटेन्मेंट सिनेमात आहे.
First published on: 17-07-2015 at 02:50 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film review bajrangi bhaijaan