अलीकडच्या काळात सोशल मिडियाच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. फेसबूक, व्हॉट्स अॅप आणि ट्विटरसारख्या सोशल साइट्सची माहिती नसेल असे फार कमीजण सापडतील. सोशल मिडियाचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे काही धोकेसुद्धा आहेत. हाच धागा पकडून मस्ती एन्टरटेन्मेंटने ‘हेडलाइन’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
यश, निखिल आणि आर्या या तीन जिवलग मित्रांची ही कथा आहे. बारावीची परिक्षा संपताच यश आणि निक (निखिल) आपला अधिकाधिक वेळ फेसबुकवर घालवू लागतात. त्यांचे हे वागणे ग्रुपमधील मित्रांना आवडत नाही. तरूण मुलांमध्ये आढळून येणारा उत्साह आणि जोश या दोघांमध्येसुद्धा असतो. याच उत्साहाच्याभरात ते एका मित्राशी महिन्याभरात मुलगी पटविण्याची पैज लावतात. पैज जिंकण्यासाठी ते दिवसरात्र फेसबूकवर चॅटींग करु लागतात. त्यांच हे वागणं आर्याला आणि त्यांच्या पालकांना आवडत नाही. फेसबुकच्या अतिवापरापासून मुलांना कशाप्रकारे परावृत्त करावे हा प्रश्न पालकांसमोर उभा राहतो. मित्रांच्या यश आणि निकच्या या वागण्यामुळे त्यांच्यापासून दुरावलेली आर्यासुद्धा त्यांचच अनुकरण करण्यास सुरुवात करते. आपल्यापासून दुरावलेल्या आर्याला चुकीच्या मार्गावर जाताना पाहून निक आणि यश आर्याला चांगल वागण्याचं वचन देत तिची माफी मागतात. असे असले तरी फेसबुकचा मोह न आवरता आल्यामुळे ते पुन्हा पूर्वीप्रमाणे फेसबूकच्या जाळ्यात ओढले जाऊन एका रेव्ह पार्टीच्या रॅकेटमध्ये अडकतात. या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी एसीपी सरदेसाई (प्रसाद ओके) यांच्यावर सोपविली जाते. फेसबूकच्या अतिवापरामुळे टीकेचे धनी ठरलेले निक आणि यश फेसबूकच्याच माध्यमातून ड्रग्ज माफियांचा छडा लावण्यासाठी एसीपी सरदेसाईंना मदत करतात. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते. हे पाहून मुलांवर नाराज असलेल्या पालकांनाही आपल्या मुलांचा अभिमान वाटतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


सोशल मिडिया हे केवळ मनोरंजन किंवा टाइमपासचं साधन नसून या माध्यातून अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा करता येऊ शकतात. हा संदेश देण्यात दिग्दर्शक सुनील वाइकर यांना ब-यापैकी यश आले असले, तरी चित्रपट कमी बजेटचा असल्यामुळे परिणामकारक झालेला नाही. आजच्या तरूण पिढीच्या वर्तनावर भाष्य करणारा हा चित्रपट अजून खुलवता आला असता. चित्रपटात दोन गाण्यांचा समावेश असून त्यांना साजेस संगीत संगीतकार प्रसाद-अद्वैत यांनी दिलं आहे. नवोदित कलाकारांनी त्यांच्या परीने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, दिग्दर्शकाने कलाकारांच्या अभिनयावर अजून लक्ष्य दिले असते तर त्यांच्या भूमिका अधिक चांगल्या होऊ शकल्या असत्या. या चित्रपटाद्वारे प्रसाद ओक पहिल्यांदाच पोलीस अधिका-याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत असून, त्याला या रुपात पाहणे चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरेल. प्रसाद ओक वगळता कोणताही मोठा कलाकार या चित्रपटात नाही. सोशल मिडियाचा वापर समाजोपयोगी कामांसाठीदेखील होऊ शकतो हा संदेश या चित्रपटाद्वारे देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
“हेडलाइन”
कथा- आरती जाधव
पटकथा- प्रदीप रघुनाथ
दिग्दर्शन – सुनील वाइकर
संगीत – परिक्रमा बॅण्ड
कलावंत – प्रसाद ओक, अजिंक्य जाधव, निखील वैरागर, शाश्वती पिंपळकर, पूजा  पवार, रवी महाजन, वंदना वाकनीस, मोहिनी कुलकर्णी, विनायक गरूड, ओंकार बोरकर, दीपक करंजीकर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film review headline