समस्याप्रधान चित्रपटातून नियतीने ओढवलेल्या प्रसंगावर मात करून विजय मिळविणे हा एक फॉम्र्युला
अनेक छोटेमोठे प्रसंग प्रत्येकच व्यक्तीवर येत असतात. त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडून यश मिळविणे हे व्यक्तीला क्रमप्राप्त ठरते. प्रत्येकाच्याच आयुष्यात अनेक चढउतार असतात तसेच काही लोकांना नियतीने निर्माण केलेल्या समस्यांचा सामना आयुष्यभर करावा लागतो. परंतु, सकारात्मकतेने पावले टाकून या समस्यांवर मात करीत जीवन जगणारे लोक खऱ्या अर्थाने यशस्वी झाले याची नोंद घ्यावीच लागते. या चित्रपटातील रिमा देशमुखने आपल्या मुलीला चांगले आयुष्य जगता यावे म्हणून स्वत:च्या करिअरला रामराम ठोकून तिचे आणि पर्यायाने स्वत:चे आयुष्य सकारात्मकपणे यशस्वी करून दाखविले आहे.
रिमा आणि अजय देशमुख हे प्रेमविवाह केलेले सुखी आणि सुखवस्तु कुटुंब आणि त्या कुटुंबात जन्मलेली छोटी मिनी असे त्रिकोणी कुटुंब आहे. एकुलती एक मुलगी असल्यामुळे आपल्या लाडक्या लेकीला आपल्यासारखे यशस्वी अभियंता बनविण्याचे स्वप्न त्याच्या मनात आहे. रिमा हीसुद्धा एक यशस्वी मॉडेल आहे. दोघांचे करिअर व्यवस्थित सुरू आहे. मिनीच्या जन्मानंतर जवळपास दीड वर्षांनंतर ती जन्मत: मूकबधिर असल्याचे समजल्यावर रिमा देशमुखच्या पायाखालची जमीन सरकते. त्यातच अजय नोकरीनिमित्त परदेशी असल्यामुळे त्याला एकदम धक्का बसू नये म्हणून ही बाब ती त्याच्यापासून लपवून ठेवते. तीन महिन्यांनंतर अजय परततो. आपल्या मुलीचे बाबा असे बोबडे बोल ऐकण्यासाठी तो आसुसलेला असतानाच मिनी मूकबधिर असल्याचे त्याला समजते. तो कोसळतो. आपली मुलगी मूकबधिर झाल्याचा दोष तो रिमाला देतो. लेकीचे लाड करणारा अजय अचानक बदलतो. दूर जातो. मिनीचा दुस्वास करतो. मिनीला अन्य मुलांसारखे सक्षम करण्यासाठी रिमा आपले करिअर सोडून तिच्यासाठी झटते. आईबाबा दोघांचे प्रेम देऊन मिनीला वाढविते. तिच्याजवळील अंगभूत गुणांची जोपासना करते. मिनी मूकबधिर असली तरी बुद्धिबळात निष्णात आहे हे समजल्यावर जगज्जेती बुद्धिबळपटू घडविण्यासाठी रिमा जिवाचे रान करते.
रिमा देशमुख ही प्रमुख भूमिका हिंदीच्या रुपेरी पडद्यावरील अभिनेत्री ईशा कोप्पीकरने साकारली असून हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. आई आणि पत्नी अशा दुहेरी भूमिका करताना होणारी घुसमट, भावनिक आंदोलने, मुलगी मूकबधिर असल्यामुळे तिच्यासमोर आपले दु:ख न व्यक्त करण्याचा आग्रह अशा छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून ईशा कोप्पीकरने रिमा देशमुख ही व्यक्तिरेखा परिणामकारक पद्धतीने दाखवली आहे. अजय देशमुखच्या भूमिकेतील समीर धर्माधिकारीने आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल अशी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर छोटय़ा पडद्यावरची छोटी रमा म्हणून गाजलेल्या बालकलाकार तेजश्री वालवलकरनेही मूकबधिर मिनी चांगली साकारली आहे.
उच्च निर्मितीमूल्ये, समर्पक दिग्दर्शन असले तरी काही भावनिक प्रसंगांचे चित्रण मनाला भिडले तरी विशिष्ट अपेक्षित उंची गाठू शकत नाहीत. ईशा कोप्पीकरची मराठी संवादफेक चपखल नाही. परंतु, आपल्या अभिनयाद्वारे तिने व्यक्तिरेखा अप्रतिम उभी केली आहे. मूकबधिर असली तरी रिमा-अजय यांना मूल तरी आहे. परंतु, आपल्याला मूल नाही याचे दु:ख वैशाली आणि विश्वास या जोडप्याच्या व्यक्तिरेखांद्वारे दाखविण्याचे पटकथा लेखनातील कसब वाखाणण्याजोगे आहे. तर्कसुसंगत पद्धतीचा चित्रपट असला तरी मुळात कर्णबधिरता मूल जन्मल्यानंतर लगेचच समजायला हवी. मूल दीड-दोन वर्षांचे झाल्यानंतर कर्णबधिर असल्याचे समजावे हे पटणारे नाही. हे गृहीतक मान्य केले तर मात्र चित्रपट निश्चितच प्रभावी ठरतो.
मात
सायली ड्रीम व्हेंचर्स निर्मित
निर्माती – मनाली सावंत
दिग्दर्शक – मनोहर सरवणकर
कथा – तेजस्विनी पंडित
पटकथा-संवाद – संभाजी सावंत
संगीत – डॉ. सलील कुलकर्णी
छायालेखन – निर्मल जानी
कलावंत – तेजश्री वालावलकर, ईशा कोप्पीकर, समीर धर्माधिकारी, मेघना वैद्य, मंजूषा गोडसे, राजन जोशी, राजेंद्र शिसतकर, सुरुची अडकर, सुहास पळशीकर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा