गेल्या काही वर्षांमध्ये माणसाने आपल्या हव्यासापायी सीमारेषा ओलांडली. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी झगडत असलेले प्राणी आता मानवी वस्त्यांकडे वळत आहेत. बिबट्याने माणसांवर, तान्ह्या बाळावर हल्ला केला केल्याच्या बातम्या कानावर पडू लागल्या आहेत. पण, आपण मात्र प्राणी माणसांवर हल्ला करत आहेत इतकंच पाहतो. आपल्यामुळे त्यांना किती त्रास सहन करावा लागत असेल, याचा साधा विचारही करत नाही. यावरच भाष्य करणारा आणि विचार करायला लावणारा चित्रपट म्हणजे ‘आजोबा’. आजोबा… वाचलं की असं वाटतं कोणातरी आजोबांची ही कथा असावी. पण असं नाही, तर बहुचर्चित ‘आजोबा’ या चित्रपटाची कथा आहे ती एका बिबट्याची. एक सत्य घटना. पुण्याच्या जुन्नर परिसरात २००९ मध्ये घडलेली सत्य घटना. विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला वनविभागाचे कर्मचारी तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढतात. या बिबट्याच्या शेपटीवर एक चीप बसवून जीपीएसच्या सहाय्याने त्याचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न वन्यजीव अभ्यासक पूर्वा राव (उर्मिला मातोंडकर) करते. या चीपला नाव दिलं जातं ’आजोबा’. त्यानंतर या आजोबाला माळशेज घाटात सोडण्यात येतं. पण, हा आजोबा सह्याद्रीच्या रांगा ओलांडत मुंबईच्या दिशेने निघतो. आपल्या मूळ घराच्या शोधात असलेला हा सहा-सात वर्षांचा आजोबा माळशेज घाट ते मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे १२० किमी अंतर जवळपास साडेतीन आठवड्यात चालत पार करतो. शहर, नद्या ओलांडत तो अखेर आपल्या घरी संजय गांधी उद्यानात जाऊन पोहचतो. विशेष म्हणजे हा प्रवास करत असताना तो कोणत्याही मनुष्याला हानी पोहचवत नाही. तो कुठल्या दिवशी कुठे गेला, हे त्याला बसवलेल्या चीपमुळे अगदी अचूक नोंद होत जात. ‘आजोबा’चा हा रोमांचित करणारा धाडसी प्रवास आणि जीपीएस तंत्राचा आधार घेत वन्यजीव अभ्यासकाला बिबट्याचा पाठलाग करताना आलेला थ्रिलिंग अनुभव यात पाहायला मिळतो.
जंगलांची जागा काँक्रीटच्या इमारतींनी घेतल्यामुळे वन्यप्राण्यांचे हाल होऊ लागले आहेत. बिबट्याच्या संचारामुळे आरे कॉलनीत दहशत, बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, बिबट्याच्या दहशतीमुळे अकोले परिसरात संचारबंदी यासारख्या बातम्या आपण सगळेच वर्तमानपत्रांतून सतत वाचत असतो. वाढतं शहरीकरण, जंगलांची नासधूस अशी अनेक कारणे प्राणी- मनुष्य संघर्ष होण्यामागे दिली जातात. त्यावरील उपाय मात्र अभावानेच सुचविले जातात. शिवाय आपण जे ऐकतो-वाचतो, त्यातले किती खरं आणि किती खोटं, जंगलातून बिबटे खरंच गावांकडे आले आहेत का? माणसांवर होणाऱ्या रोजच्या हल्ल्यांमुळे बिबट्यांची शिकार करण्याशिवाय पर्याय नाही का? असे प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात. या प्रश्नांचा वेध घेत बिबट्यांचे जीवन अधिक चांगल्या रितीने समजून घेण्यासाठी याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सुजय डहाकेने चांगल्या रितीने केला आहे. व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून चित्रपटातील कथेतला थरार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. मुळात या चित्रपटातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स. कारण प्रत्येक वेळी खरा बिबट्या आणि इतर प्राणी दाखवणं हे शक्य नसल्यामुळे व्हिज्युअल इफेक्ट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. चित्रपट पाहताना आवर्जून आठवण येते ती लहानपणी पाहिलेल्या मोगली या कार्टूनची. कारण चित्रपटातील काही इफेक्ट्स हे त्यातूनचं घेतले असल्याचे चित्रपट पाहताना वाटत राहते. वन्यप्राण्यांचे आवाज, साउंड इफेक्ट्सचा योग्य वापर करण्यात आला आहे. मराठीत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला असल्यामुळे हा चित्रपट प्रशंसेला पात्र ठरतो. एकंदरीत खूप दिवसांपासून सर्वांचीच उत्सुकता ताणून धरलेला ‘आजोबा’ एकदा तरी चित्रपटगृहात जाऊन पाहावाच असा आहे. चित्रपटातील कलाकारांबाबत बोलायचं तर उर्मिला मातोंडकरने पुनर्पदार्पणासाठी योग्य चित्रपटाची निवड केली आहे, असे म्हणावयास हवे. तिच्या अभिनयाबाबत बोलावे तितके कमीच आहे. बॉलिवूडला आपल्या अफलातून नृत्याने आणि अभिनयाने भुरळ घालणा-या या रंगिला गर्लने या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयात अजूनही तितकीच धमक असल्याचे दाखवून दिले आहे. बाकी तिला तितकीच चांगली साथ दिली आहे ती सध्या ‘यलो’ चित्रपटातील मामाच्या भूमिकेने मराठी प्रेक्षकांवर राज्य करणा-या ऋषिकेश जोशीने. ऋषिकेशने जणू काही उत्तम चित्रपट देण्याचा सपाटाच लावला आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, हिंदी अभिनेता यशपाल शर्मा, श्रीकांत यादव, ओम भूतकर, नेहा महाजन यांच्याही चित्रपटात भूमिका असून त्यांनीही खारीचा वाटा का होईना पण आपल्या अभिनयाने चित्रपटाला परिपूर्ण केले आहे. हा वीकएन्ड तर तुमचा नक्कीच वाया जाणार नाही. कारण…. ‘आजोबा’ चित्रपटगृहात तुमची वाट बघतोय.
दिग्दर्शक- सुजय डहाके
कथा- गौरी बापट
संगीत- साकेत कानेटकर
व्हिजुअल इफेक्ट्स- इल्युशन इथेरिअल
कलाकार- उर्मिला मातोंडकर, दिलीप प्रभावळकर, यशपाल शर्मा, ऋषिकेश जोशी, श्रीकांत यादव, ओम भुटकर, नेहा महाजन, गणेश मयेकर, शशांक शेंडे, अनिता दाते, चिन्मय कुलकर्णी, विराट मडके, अनुया काळसेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा