गणितातील किचकट समीकरणं, भौमितिक सिद्धान्त, गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकी या सगळ्या गोष्टींचा जगण्याशी असलेला संबंध आणि गणित विषयापेक्षाही अधिक किचकट, गुंतागुंतीचे प्रश्न rv9माणसांच्या आयुष्यात निर्माण होत असतात, गणितातले सिद्धान्त-समीकरणांचा पेपर सोडविताना कठीण वाटत असला तरी ते सिद्धान्त-कूटप्रश्न आधी कुणी तरी सोडविलेले, सिद्ध करून दाखविलेले असतात. परंतु, माणसांचे नातेसंबंध हे त्याहीपेक्षा अधिक जटिल प्रश्न निर्माण करतात, हाच विषय ‘सिद्धान्त’ या मराठी चित्रपटातून मांडण्यात आला आहे. उत्तम कलावंत, उत्तम संगीत, उत्तम कथा असली तरी मध्यंतरापूर्वी काहीसा कंटाळा आणणारा हा चित्रपट मध्यंतरानंतर झपाटय़ाने कूटप्रश्नाची उकल करतो.
घरातील जवळच्या व्यक्तींशी असलेले नातेसंबंध असोत की घराबाहेर व्यक्तिगत पातळीवरचे नातेसंबंध असोत, नात्यांमध्ये होणारे गैरसमज, नात्यांतले ताणेबाणे, मनुष्यस्वभावामुळे नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी, गुंता याचा वेध घेण्याचाही प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. जगण्यातले गणित हे गणित या विषयातील कूटप्रश्नांपेक्षा अधिक किचकट, सोडवायला अधिक कठीण असते हे चित्रपट नमूद करतो. हे मांडण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट, त्याची गुंफण, अनेक कोन मांडताना व्यक्तींचे स्वभाव त्यांच्या जगण्याच्या आड कसे येत असतात हेदेखील चित्रपट अधोरेखित करतो.
गणेश गोविंद ठोसर ऊर्फ अप्पा हे गणितज्ञ आहेत. गावात गणित अकादमी सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. निवृत्त झाल्यानंतरही पुढील पिढीतील विद्यार्थ्यांना गणिताची गोडी निर्माण व्हावी, आपल्यासारखे गणितज्ञ तयार व्हावेत हा अप्पांचा अकादमी सुरू करण्यामागचा उद्देश आहे. अप्पांची बायको म्हणजे माई गणेश ठोसर या घर सांभाळतात. विश्वनाथ हा अप्पांचा मोठा मुलगा आणि त्याची बायको यांचे अपघाती निधन झाले असून या दाम्पत्याचा मुलगा आणि नातू वक्रतुंड हा अप्पांचा सर्वात लाडका आहे. तर वक्रतुंडचा मोठा भाऊ माधव हा क्रूझवर नोकरी करायला गेला आहे. अप्पांचा धाकटा मुलगा गजानन आणि त्याची बायको सविता हे मसाला उद्योग सांभाळतात. एक अशी म्हटली तर छोटीशी म्हटली तर भयानक वाटेल अशी एक घटना घडते आणि अप्पा-वक्रतुंड यांचे नाते, वक्रतुंडचे आजीशी असलेले नाते, माधवकडून झालेल्या चुकांमुळे निर्माण झालेला नात्यांचा गुंता, सविता-गजानन यांचे अप्पा आणि माई यांच्याशी असलेले नाते अशा सगळ्याच जवळच्या नात्यांमध्ये घट्ट पेच निर्माण होतो. हे गणित माधव पुढाकार घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करतो, याभोवती चित्रपटाची मांडणी केली आहे. नात्यांमध्ये निर्माण झालेला तिढा आणि मनात एकमेकांविषयी निर्माण झालेली अढी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न माधव करतो. rv10
पदार्पणातच दिग्दर्शकाने निव्वळ करमणूक, मसालापट, प्रेमपट असे सरधोपट विषय हाताळण्यापेक्षा नातेसंबंधांवर निराळ्या कोनातून भाष्य करण्याचा प्रयत्न करणारा विषय हाताळण्याचे आव्हान पेलले आहे.
अप्पांच्या भूमिकेतील विक्रम गोखले आणि त्यांचा नातू वक्रतुंड या भूमिकेतील बालकलाकार अर्चित देवधर यांनी आपापल्या भूमिका अतिशय समरसून केल्या आहेत. त्याचबरोबर माई ठोसर या भूमिकेतील स्वाती चिटणीस, सविताच्या भूमिकेतील माधवी सोमण आणि गजानन या भूमिकेतील गणेश यादव यांनीही समर्थपणे भूमिका पेलल्या आहेत. व्यक्तिरेखांसाठी केलेली कलावंतांची निवड आणि कलावंतांचा समर्थ अभिनय हे या चित्रपटाचे बलस्थान ठरले आहे.
अवघड आणि गुंतागुंतीची पटकथा पडद्यावर मांडताना मध्यंतरापूर्वीच्या काही लांबलचक प्रसंगांमध्ये प्रेक्षक रमू शकत नाही. असे काही प्रसंगांचे संकलन करूनही चित्रपटाचा विषय मांडता असता. उत्तम संगीत आणि गाणी, उत्तम छायालेखन याही चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.
गणित विषय शिकविणे हा काही चित्रपटाचा उद्देश नाही. गणिती सूत्रांप्रमाणे नात्यांमधील सूत्रांचे गणित सोडविण्याचा प्रयत्न चित्रपट करतो. मध्यंतरापूर्वीचे कंटाळवाणे प्रसंग वगळता नेहमीपेक्षा निराळ्या प्रकारच्या मांडणीची प्रेक्षकांना असलेली अपेक्षा चित्रपट काही अंशी पूर्ण करतो.

सिद्धान्त
निर्माते – नीलेश नवलखा, विवेक कजारिया, अमित अहिरराव
दिग्दर्शक – विवेक वाघ
लेखक – शेखर ढवळीकर
छायालेखक व संकलक – मयूर हरदास
संगीत – शैलेंद्र बर्वे
गीते – सौमित्र
कलावंत – विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, गणेश यादव, प्रवीण तरडे, माधवी सोमण, सारंग साठय़े, चंद्रकांत कुलकर्णी, नेहा महाजन, किशोर कदम, बालकलाकार अर्चित देवधर, बाबा आफळे, प्रशांत तपस्वी, सूरज सातव, कांचन जाधव, अमित वझे व अन्य.

Story img Loader