‘पोस्टकार्ड’ म्हणजे गूढतेच्या अंगाने जाणारी कथा. कथा स्वतःबरोबर विशिष्ट वळणांनी आपल्याला वाहत नेते. अगदी काही ठिकाणी आपण स्वतःच रेंगाळत राहतो. ‘एक मुखवटा, जो अशा माणसाने बनवला आहे ज्याची शेवटची इच्छा अपूर्ण राहते, तोच मुखवटा माणसांच्या इच्छा पूर्ण करतो?’ अशी एका वाक्यात सांगायची कथा. ‘पोस्टमन’ या चित्रपटात १९६५ ते ७० या दरम्यानच्या काळाचा वेध घेण्यात आला असून एका पोस्टमनला नोकरी करताना आलेले अनुभव हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. घरोघरी पत्र टाकताना लोकांची दु:ख, आनंद याचा अनुभव पोस्टमनलाही येत असतो. त्यातील तीन घटनांचा साक्षीदार ठरलेल्या, त्यात गुंतलेला पोस्टमन, त्या घटनांमधून त्याला मिळालेली जीवन समृद्धता याचे चित्रण या चित्रपटातून बघायला मिळते. रुपक कथा ह्या फॉर्ममध्ये ‘पोस्टकार्ड’ चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले आहे. मानवी भावनांचा गुंता आणि नियतीची अढळता यातून काही भाव्याकूळ माणसं या चित्रपटातील कथेतून समोर येतात.
चित्रपटात तीन कथांचा समावेश आहे. त्यामुळे गिरीश कुलकर्णी सोडले तर कोणत्याही कलाकाराच्या भूमिका मोठ्या नाहीत. विभावरी देशपांडे, किशोर कदम, सुबोध भावे, सई ताम्हणकर म्हणजे तर अभिनयातले एक्केच आहेत. पण सगळ्यांवर कडी केली आहे ती अर्थात दिलीप प्रभावळकर यांनी. आपलं आधीचं काम त्यांनी विसरायला लावलं. नातीगोती आणि आपली माणसं नंतर त्यांची गंभीर भूमिका पाहायला मिळते. चित्रपट असो वा नाटक. मालिका असो वा लघुपट. त्यातील व्यक्तिरेखा जीवंत करण्यासाठी कलावंताला जिवाचं रान कराव लागतं. ती व्यक्तिरेखा कधी कलावंताने बघितलेली नसते. कधी संबंधही आलेला नसतो, पण ती जीवंत करायची असते. ज्या भूमिका एखाद्या पारंपारिक कामांवर आधारलेल्या असतात, त्या अनुभवनं महत्वाचं असत. अशीच भूमिका साकारली आहे दिग्गज अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी. दुनियादारीनंतर सईमधली अभिनेत्री आता लोणच्यातल्या कैरीच्या फोडीप्रमाणे अभिनयात मुरू लागली आहे. सई ताम्हणकरने तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस रुपाला जरा आराम देऊन काहीतरी वेगळं करण्याचा तिचा प्रयत्न यशस्वी होत आहे. भूमिका ग्लॅमरस नसली तरी साध्या सरळ रुपाने आणि अभिनयाने ती नक्कीच सर्वांचे लक्ष्य वेधते. चित्रपटात कलाकारांनी त्यांच्याबाजूने शंभर टक्के काम केले आहे. गिरीश कुलकर्णीने कथेच्या नायकाला योग्य न्याय देऊन अतिशय समजुतीने वठवला आहे. एक दिग्दर्शक म्हणून तो जितका सहज आहे तितक्याच सहजतेने त्याने पोस्टमन साकारला आहे. पण ‘गुलजार’च्या रूपात जाता जाता राधिका आपटे स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवून जाते. चित्रपट संपताना लक्षात राहते ती तिची हाक ‘ कासीब मेरा खत’. तिने वाट पाहण्यातली आर्तता आणि भेट झाल्यानंतरचं समाधान खूपच तरलतेने दाखवल आहे.’श्याम आयो’ ही ठुमरी नुसती गुणगुणावीशी नाही वाटतं तर ती मनात रूंजी घालत राहते. मात्र, गजेंद्र अहिरे यांनी आता काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे असे वाटते. गजेंद्र अहिरेंचा चित्रपट म्हणजे एकंदरीतच मानवी मनातल्या ब-या- वाईट, ख-या-खोट्या, हव्या-नकोश्या भावनांची गुंतागुंत. ज्यांची उत्तर आपली आपणच शोधायची असतात. यापलीकडे जाऊन त्यांनी थोडं वेगळं काहीतरी करण्याची गरज वाटतेय. बाकी चित्रपटाबाबत बोलायचं तर मराठीसाठी चित्रपटसृष्टीत अजून एका चांगल्या चित्रपटाची भर पडली आहे. निदान एकदा तरी ‘पोस्टकार्ड’ पाहायला हरकत नाही. चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासजमा झालेल्या ‘पोस्टकार्ड’च्या आठवणी तरी नक्कीचं ताज्या होतील.
फिल्म रिव्ह्यूः भावनिक गुंतागुंतीचा ‘पोस्टकार्ड’
पोस्टकार्ड आणि ती घरोघरी आपल्यापर्यंत पोहचवणारा पोस्टमन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडला गेलेला दुवा आह़े.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-04-2014 at 10:37 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film review postcard marathi movie