मराठी रसिकांना चित्रपटापेक्षा नाटक नेहमीच जवळचे वाटत आले आहे. मराठी नाटकाला प्रदीर्घ परंपरा आहे. नाटकातील कलावंताची शोकांतिका या गंभीर आणि आतापर्यंत रुपेरी पडद्यावर न आलेल्या वेगळ्या विषयावरील ‘रंगकर्मी’ हा चित्रपट, त्यातील दिग्गज कलावंत यामुळे महत्त्वाचा ठरला खरा. परंतु पूर्वघटित तंत्र, कथानकातील गोंधळ यामुळे अपेक्षित उंची गाठू शकत नाही. नावाजलेल्या कलावंतांच्या जोरावर नाटक उभे असते, परंतु या चित्रपटात नावाजलेले कलावंत असले तरी त्या पलीकडे चित्रपट फार काही प्रेक्षकाला देऊ शकत नाही. फ्लॅशबॅक तंत्रामुळे चित्रपट फसतो, फिका ठरतो.
मराठी रंगभूमीची परंपरा मोठी आहे. संगीत रंगभूमीपासून ते आजच्या मराठी रंगभूमीपर्यंत अनेक नाटककार, अभिनेते, अभिनेत्री, नाटक कंपन्यांचे अध्वर्यू, पडद्यामागचे कलावंत, कामगार, दिग्दर्शक, नेपथ्यकार, रंगभूषाकार अशा कलावंतांनी समृद्ध केलेली ही परंपरा या विषयावरचा चित्रपट म्हणून ‘रंगकर्मी’ या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु दोन्ही प्रमुख कलावंतांचा अभिनय वगळता प्रेक्षकाला फारसे काही हाती लागत नाही.
केशव मल्हार इनामदार हा साताऱ्यातील नाटकवेडा तरुण. रंगभूमीवरचा मोठा कलावंत, मोठा नायक बनण्याचे स्वप्न घेऊन मायानगरी मुंबईत तो येतो. पडेल ते काम रंगभूमीवर करायचे आणि एक दिवस आपले अंगभूत गुण आाणि प्रचंड आत्मविश्वास या जोरावर मोठा नट व्हायचे केशवचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरते. त्यासाठी त्याला द्वारकानाथ कांबळी या ज्येष्ठ रंगभूषाकाराचा वरदहस्त लाभतो, त्यांचे मार्गदर्शन मिळते. आपले गुरू, मार्गदर्शक म्हणून केशवलाही द्वारकानाथ कांबळी यांच्याबद्दल नितांत आदर असतो, परंतु यशाचे एकेक सोपान पार करून रंगभूमीवरील यशस्वी नट बनल्यानंतर केशवला यशाची धुंदी आणि त्याचबरोबर दारूची धुंदी चढते. त्यात तो वाहवत जातो. गुरूचा अपमान करतो, सगळे जग आपल्या मुठीत आल्याचे त्याला वाटू लागते. कमालीचा अहंकार आणि अतिआत्मविश्वास आणि त्यात दारूच्या आहारी जाणे यामुळे केशवची शोकांतिका होते.
एका उत्तम कलावंताची शोकांतिका हा विषय पडद्यावर येऊन गेला असला तरी मराठी रंगभूमीवरील कलावंताची शोकांतिका या विषयावरील चित्रपट अभावानेच आला आहे. त्यामुळे ‘रंगकर्मी’ या चित्रपटाबद्दल खूप अपेक्षा केल्या जात होत्या. केशवची भूमिका डॉ. अमोल कोल्हे आणि द्वारकानाथ ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारत असल्यामुळेही खूप अपेक्षा होत्या. शोकांतिका साकारताना अपेक्षित असलेली उंची चित्रपट गाठू शकत नाही असे प्रकर्षांने जाणवले.
मोठा नट होईपर्यंत आणि मुंबईसारख्या महानगरात मूळच्या अस्सल कलावंताला गुरू भेटणे, त्यासाठी त्याला कोणताही संघर्ष करावा न लागणे या गोष्टी पटत नाहीत. त्यातच सुरुवातीपासूनच केशव व्हेंटिलेटरवर दाखविलेला असून चित्रपट फ्लॅशबॅक तंत्राने उलगडत नेताना दाखविला आहे. फ्लॅशबॅकमध्ये दाखवायला काही हरकत नाही, परंतु फ्लॅशबॅकमधून पुन:पुन्हा वर्तमानातील प्रसंग दाखविणे पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जाणे यामुळे प्रेक्षकाचा रसभंग होतो.
रंगभूषाकार द्वारकानाथ कांबळी ही व्यक्तिरेखा मोहन जोशी यांनी अप्रतिम साकारली आहे. रंगभूमीशी असलेली निष्ठा, नाटकाची परंपरा, त्याला अनुसरून असलेली तत्त्वनिष्ठता या गोष्टी आपल्या संयत अभिनयातून त्यांनी दाखविल्या आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनीही केशव इनामदार ही व्यक्तिरेखा चांगली सादर केली आहे. यशस्वी ठरल्यानंतर जागृत झालेला अहंकारी केशव हा संपूर्ण चित्रपटात वरचढ ठरतो हे त्यांनी आपल्या देहबोलीतूनही दाखविले आहे. वास्तविक दोन कलावंतांची अभिनय जुगलबंदी पाहण्याची संधी दिग्दर्शकाने दिली आहे. रंगभूषाकाराने कलावंतापेक्षा नेहमीच आधी यावे हे तत्त्व द्वारकानाथ कसोशीने पाळतात. याचा कळस चित्रपटाच्या शेवटीही करणे पटत नाही. केशव अस्सल अभिनेता आहे. त्याच्याजवळ दोन बाहुल्या कायम असतात. एक पांढरी आणि एक काळी. ती त्याची दोन मनं आहेत. प्रत्येक गोष्टीची चांगली आणि वाईट बाजू ही दोन मनं त्याला नेहमी सांगतात. ही गंमत दिग्दर्शकाने अतिशय चांगल्या रीतीने दाखविली आहे हे खरे. कलावंताची शोकांतिका एका उंचीवर जाऊ शकत नाही. अपेक्षित परिणाम साधू शकत नाही.
रंगकर्मी
शशीसुमीत मोशन पिक्चर्स प्रस्तुत
निर्माते – शशी मित्तल, सुमीत एच. मित्तल
दिग्दर्शक – संजीव कोलते
कथा – संजीव कोलते
पटकथा-संवाद – संजीव कोलते, सुमीत मित्तल
संगीत – प्रवीण कुंवर
छायालेखन – जितेंद्र आचरेकर
कलावंत – मोहन जोशी, डॉ. अमोल कोल्हे, शीतल दाभोळकर, शर्मिष्ठा राऊत, विलास उजवणे, उपेंद्र दाते, राम कोल्हटकर, राजन जोशी, प्रफुल्ल सामंत, देवेंद्र दोडके, महेश बोडस, दिनेश कानेड, मृणाल गावडे, दीपज्योती नाईक व अन्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा