अचानक येणाऱ्या पैशातून बिघडत जाणाऱ्या  व्यक्तींची मनोवस्था आणि घसरत जाणारी नीतिमत्ता यावर शेकडो चित्रपट निघाले आहेत. दरोडा फसलेल्या किंवा पचलेल्या सर्वच चित्रपटांमध्ये पैसा हा एक महत्त्वाचा घटक म्हणून व्यक्तिरेखांना आपल्याभोवती फिरविताना दिसतो. ‘शॅलो ग्रेव्ह’, ‘सिम्पल प्लान’, ‘बिग नथिंग’, ‘स्लमडॉग मिलिऑनेर’, ‘मिलिअन्स’, ‘किल मी थ्री टाइम्स’ यासारख्या चित्रपटांमध्ये पैशांवरून किंवा पैशांमुळे कथानकाला वेगवान रूप आलेले पाहायला मिळते. अशा चित्रपटांमध्ये नडलेल्या-नाडलेल्या व्यक्तींकडून नीतिमत्तेला अधिकाधिक फाटा फोडत मानवी आदिम अवस्थेला प्रगट केले जाते. कोणत्याही परिस्थितीत माणूस हा स्वार्थीच असतो, हे बिंबविले जाते. अडीअडचणींमुळे पापभीरू व्यक्ती पैशांसाठी रसातळाला गेलेली दाखविण्याचा नियम या चित्रपटांनी घालून दिलेला असतो (आठवा, ‘मालामाल विकली’ किंवा ‘हेराफेरी’तली एकेक वल्लीरेखा). यामुळे जेव्हा तुम्ही जो स्वानबर्ग दिग्दर्शित ‘विन इट ऑल’ हा चित्रपट पाहता, तेव्हा त्यातील प्रमुख व्यक्तिरेखेच्या आयुष्यात अचानकपणे येणाऱ्या पैशाद्वारे वरीलपैकी काहीच घडत नाही म्हणून बाचकायला लागता. इथलं नाटय़ वेगवान नसल्यामुळे भांबावून जाता आणि इथल्या वास्तववादी मांडणीमुळे हरखून जाता.

सिनेमा नेहमी वास्तव आयुष्यात घडणार नाहीत इतक्या टोकाच्या वाईट किंवा टोकाच्या चांगल्या पातळीवरील घटना दाखवतो, अशी नेहमी ओरड होते. त्याला लक्ष्य करूनच अभिनेते जॅक जोहान्सन आणि जो स्वानबर्ग यांनी ‘ड्रिंकिंग बडीज’ (२०१३) आणि ‘डिगींग फॉर फायर’ (२०१५) नावाचे दोन उत्तम सिनेमे एकत्र लिहून बनविले. चित्रपटात दाखविल्या जाणाऱ्या प्रेम, नातेसंबंध, लग्नानंतर नवरा-बायकोमधील तणाव आदी कडू-गोड अवस्थांच्या पारंपरिकपणाला टाळून हे चित्रपट त्यांचे कथानक रंजकरीत्या याच विषयांना अत्यंत वेगळ्या मांडणीतून फिरवत ठेवतात. ‘विन इट ऑल’ हा त्यांचा या वर्षांतला सिनेमाही जोहान्सन-स्वानबर्ग जोडीच्या आधीच्या चित्रपट प्रकल्पांसारखाच आहे. कमी बजेट आणि चित्रप्रकारानुरूप कथानकाच्या येणाऱ्या रूढ वाटा टाळण्याचा इथे चांगला प्रयत्न आहे.

इथला नायक एडी (जॅक जोहान्सन) हा लौकिकार्थाने काय करतो, हा चकवायुक्त प्रश्न सुरुवातीला पडणे स्वाभाविक आहे. तो समोर येतो अतिशय ताणपूर्ण अवस्थेत, झोपरहीत डोळ्यांनी आणि भणंगसदृश अवताराने. हा फारच व्यग्र प्रवृत्तीचा इसम असल्याचे आपल्या मनात येऊन जाते. त्यात इतके काम करूनही न्याहारीसाठीही पैसे त्याच्याजवळ नसल्याचे अन् तीदेखील तो उधारीवर घेत असल्याचे दिसून येते. पण थोडय़ाच वेळात त्याची कफल्लक व्यग्रता लक्षात यायला लागते. एडी हा अट्टल जुगारी असल्याने दररोज आपल्याजवळ असलेल्या पैशांना फुंकून टाकण्याचे व्यसन त्याला लागलेले असते. त्याचा एकटेपणा आणि त्यातून येणाऱ्या अनंत अडचणींनी कितीही प्रयत्न केले, तरी तो आपल्या व्यसनाला सोडू शकत नाही. कुटुंबाच्या व्यवसायामध्ये भावाला मदत करू शकत नाही. त्याचे व्यसनांचे दृष्टचक्र कायम राहते. तशातच एक दिवस पूर्वाश्रमीची ओळख असलेला गँगस्टर त्याच्या घरात दाखल होतो. काही महिन्यांची तुरुंगवारी करणार असल्याने तो गँगस्टर आपली लाखो डॉलरची बॅग एडीकडे सांभाळण्यासाठी देतो. त्याला यासाठी चांगला मोबदला मिळणार असतो, पण अट असते, एडीने ती पैशांची बॅग जपून ठेवण्याची आणि अर्थातच कधीही न उघडण्याची. गँगस्टर निघून जातो, पण एडीची नैतिक सत्त्वपरीक्षा सुरू होते.

सल्ले देण्याची अचूक क्षमता असलेल्या आपल्या मित्राला तो ही बाब सांगतो. यातले थोडे पैसे जुगारासाठी उसने घेऊन नंतर जिंकल्यावर परत ठेवायचे, हा त्याचा इरादा चुकीचा असल्याचे मित्र स्पष्ट करतो. पण एडी ऐकत नाही. तो सुरुवातीला निव्वळ ५०० डॉलर बॅगमधून काढतो आणि जुगारात चार पटींनी पैसे कमावतो. त्या आनंदामध्ये तो मित्रांना पार्टी देतो आणि आपला निर्णय कसा योग्य होता, त्याबाबत उत्सव साजरा करतो. या उत्सवात त्याला एकल मातृत्व स्वीकारलेली एक मैत्रीण भेटते. तिच्याशी रोमॅण्टिक संबंधांची स्वप्ने पाहतच तो जुगाराची नवी धाडसे आखतो. जिंकलेल्या रक्कमेहून दहापटींनी रक्कम हरल्यानंतर आता त्याला स्वत:ला सुधारण्याचा साक्षात्कार होतो. गँगस्टरच्या बॅगमधील रक्कम परत करण्यासाठी जुगार सोडून तो आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात भावाला मदत करतो. मैत्रिणीसोबत प्रामाणिक प्रेमसंबंध प्रस्थापित करतो. पण गोष्टी इतक्या टोकाला उलट घडू लागतात की त्याचे ‘वाल्याचे वाल्मीकी’ होणे कठीण होऊन जाते. वाढत जाणाऱ्या कर्जाला संपविण्यासाठी त्याला नवा पर्याय शोधायला लागतो.

हा चित्रपट अचानक येणाऱ्या पैशांमुळे बिथरणाऱ्या, बिघडणाऱ्या कोणत्याच गोष्टी आणत नाहीत. उलट पैशांच्या येण्यामुळे नायक आयुष्यात पहिल्यांदाच नैतिक-अनैतिक कसोटय़ांवर स्वत:ला पारखून घेताना दिसतो. स्वसुधारणेचा मार्ग म्हणून तो या पैशांकडे पाहतो. जॅक जोहान्सन या अभिनेत्याने साकारलेला सुधारेच्छू जुगारी आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या जुगाऱ्यांपेक्षा खूप वेगळा आहे. तो रोमान्सच्या आघाडीवर निष्णात आहे आणि आपल्या जुगारउद्योगात पारंगत. एक जुगारी अचानक येणाऱ्या पैशांनी स्व-सुधारणेच्या मार्गाला कवटाळू पाहतो, त्याची रंजक नीतीकथा या चित्रपटाने मांडली आहे. अलीकडे सर्वार्थाने चांगला चित्रपट पाहायला मिळणे अवघड असण्याच्या काळात ‘विन इट ऑल’ पाहण्याचा जुगार आपल्यासाठी फलदायी ठरू शकतो.

Story img Loader