पंजाबमधल्या कुठल्याशा गावच्या रेल्वेस्थानकावर मार खाऊनही काजोलच्या वडिलांचे मन जिंकू न शकलेला शाहरूख खान हताशपणे काजोलकडे पाहत समोर आलेल्या ट्रेनमध्ये चढतो.. ट्रेन सुटते..काजोल वडिलांनी पकडलेला हात सोडवते.ट्रेनपाशी पळत जाते आणि मग तिचा हात पकडून शाहरूख तिला धावत्या ट्रेनमध्ये खेचतो.. प्रेक्षक हुश्श करतात. हे चित्रपटातलं पंजाबचं रेल्व स्टेशन होतं कोकण रेल्वेवरचं ‘आपटा’ स्टेशन.  आजही चित्रीकरणासाठी चित्रपट निर्मात्यांची सर्वाधिक पसंती या आपटा स्टेशनला आहे. मात्र आता आपटाबरोबरच नीरा, वठारसारख्या वेगळ्या रेल्वेस्थानकांवर चित्रीकरण वाढावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मालेगावकर यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांत रेल्वे आणि रेल्वेस्थानक परिसरात चित्रीकरणाचा टक्का सातत्याने वाढतो आहे. २०११ मध्ये विविध रेल्वेस्थानकांवर १३ चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते. त्यातून जवळजवळ ६१ लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले. २०१२ मध्ये तेवढय़ाच चित्रपटांचे चित्रीकरण करूनही एक कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेच्या तिजोरीत जमा झाले. ही वाढ जवळजवळ ७२ टक्के आहे. रेल्वेस्थानकांवर चित्रीकरणासाठी चित्रपटांना परवानगी दिली जाते. पण रेल्वेसाठी हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत नसल्याने एक ठरावीक दर आकारून आणि नियमांच्या चौकटीत राहून चित्रीकरण करण्याची परवानगी दिली जाते. उत्पन्न वाढविण्यासाठी म्हणून अव्वाच्या सव्वा दर आकारला जात नाही. तरीही चित्रपट निर्मात्यांचा रेल्वेस्थानक आणि परिसरात चित्रीकरण करण्याकडे कल वाढत असल्याने रेल्वेला चांगला फायदा होत असल्याचे मालेगावकर यांनी सांगितले.
सध्या मुंबई आणि उपनगरांतील रेल्वेस्थानके, वाडीबंदर, लोणावळा आणि पुणे या ठिकाणी चित्रीकरणासाठी सर्वात जास्त सव्वा लाख रुपये एवढा दर आकारला जातो. त्याखालोखाल आपटा, पेण आणि देवळाली या स्थानकांवर सर्वाधिक चित्रीकरण केले जाते. येत्या काळात डोंगराच्या कुशीत वसलेल्या वठार, नीरा, चिखली, चौक अशा स्थानकांवर चित्रीकरण वाढावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एखाद्या निर्मात्याला एखादे ठिकाण आवडले की आपोआप त्याची माहिती दुसऱ्या निर्मात्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळे प्रसिद्धीसाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नसल्याचे मालेगावकर यांनी सांगितले.
२०१२-१३ मध्ये चित्रीकरण झालेले चित्रपट – शूटआऊट अ‍ॅट वडाळा, द लंच बॉक्स, चेन्नई एक्स्प्रेस, गुंडे, रमया वस्तावैय्या, हिम्मतवाला, वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई अगेन. सर्वाधिक उत्पन्न- गुंडे (२३.९६ लाख रुपये), वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई अगेन (२१.१६ लाख रुपये)

Story img Loader