‘नावात काय आहे?’ हा प्रश्न बॉलीवूडमध्ये चित्रपटांच्या नावांमुळे उठणारा गदारोळ ज्याने अनुभवला आहे तो माणूस तरी कधीच विचारणार नाही. कित्येक चित्रपटांच्या नावाला कधी सेन्सॉर बोर्ड तर कधी कुणी आक्षेप नोंदवला म्हणून लागलेली कात्रीची उदाहरणे बॉलीवूडमध्ये कमी नाहीत. सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या ‘बालाजी मोशन पिक्चर’ आणि ‘बिजॉय नम्बियार’ यांची निर्मिती असलेला ‘कूकू माथुर की झंड हो गयी’ या चित्रपटाच्या नावावरूनही असाच गोंधळ उडाला होता. दिल्लीतील गल्लीबोळांमध्ये, मित्रांच्या अड्डय़ावर बिनदिक्कत वापरला जाणारा ‘झंड’ हा शब्द चित्रपटाच्या नावात वापरला तरी फारसा फरक पडणार नाही, अशी समजूत दिग्दर्शक आणि निर्मात्यांची होती. पण, त्यावरही आक्षेप नोंदवला गेला. मात्र, ‘एकता कपूर’सारखी खमकी निर्माती असल्याने या वादावर पडदा पडला.
चित्रपटाचे नाव जरी वादाच्या भोवऱ्यात सापडले असले तरी चित्रपटाचा विषय मात्र हलकाफुलका आहे. दिग्दर्शक ‘अमन सचदेवा’च्या भाषेत म्हणायचे तर ‘ड्रामेडी’ आहे. हलक्याफुलक्या प्रासंगिक विनोदांवर हा चित्रपट आधारलेला आहे. दिल्लीमधल्या दोन जिवलग मित्रांची ही गोष्ट आहे. त्यातला एक आहे श्रीमंत घरातला मस्तमौजी ‘रोनी’ ज्याला प्रत्येक गोष्ट हातात मिळाली आणि दुसरा आहे गरीब घरातील आईविना वाढलेला चित्रपटाचा नायक ‘कुकू’. जो काहीही करायला गेला तरी त्याची फजिती होणार हे ठरलेलं. कुकूच्या फजित्या सावरत, सांभाळत हे दोन मित्र आयुष्यात आपापली ध्येयं कशी गाठतात यावर संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे.
चित्रपटाच्या गोष्टीप्रमाणेच या चित्रपटानिमित्त एकत्र आलेले दिग्दर्शक अमन सचदेवा आणि तीन नवोदित कलाकार सिद्धार्थ गुप्ता, आशीष जुनेजा आणि सिमरन कौर यांची गोष्टी तितकीच भन्नाट आहे. तिघेही वेगवेगळ्या वाटेवरचे, चित्रपटाच्या क्षेत्रात आपले नाव नोंदवण्यासाठी धडपडणारे हे चौघेही आज एकमेकांचे घट्ट मित्र झाले आहेत. त्यांचा या चित्रपटापर्यंत पोहचण्याचा प्रवासही त्यामुळे तितकाच मजेदार आहे.
लघुपटांनी मला घडवले – दिग्दर्शक अमन सचदेवा
लघुपटांचे माझ्या आयुष्यातील स्थान फार महत्त्वाचे होते, त्यांनी मला घडवले, लोकांसमोर आणले. या लघुपटांच्या माध्यमातून मला राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत मजल मारणे शक्य झाले. लघुपटांमधून तुम्हाला वेगवेगळे विषय हाताळायला मिळतात, भिन्न प्रवृत्तीच्या माणसांबरोबर काम करायची संधी मिळते. या सर्व गोष्टींचा फायदा मला हा चित्रपट तयार करताना झाला. पहिल्याच चित्रपटासाठी एकता कपूर आणि बिजॉय नम्बियार यांच्या निर्मितीचे पाठबळ लाभले तेव्हाच जबाबदारीची जाणीव झाली होती. पण, लघुपट तयार करताना केलेल्या कार्यशाळा पद्धतीचा वापर हा चित्रपट तयार करतानाही केल्यामुळे नवीन कलाकारांबरोबर काम करणे तितकेसे कठीण गेले नाही.
मॉडेल्सना लक्ष्य करणं खुपतं – सिमरन कौर मुंडी
‘मिस इंडिया’ झाल्यावर तीन र्वष मी केवळ मॉडेलिंग क्षेत्राला दिली. त्यानंतर मात्र इतरांप्रमाणे अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमवायचं हे ठरवलं. काही काळ धडपडत असतानाच अचानक हा चित्रपट माझ्याकडे चालून आला. या क्षेत्रात प्रकर्षांने जाणवणारी गोष्ट म्हणजे मॉडेल्सना सहज आणि लगेच लक्ष्य केलं जातं. मॉडेल्सप्रमाणेच इतर क्षेत्रांतील मुलीसुद्धा या क्षेत्रात आपलं नशीब आजमावयाला येतात. त्यातल्या सगळ्याच यशस्वी होतात असे नाही. पण, एखादी मॉडेल या क्षेत्रात आली की लगेच तिच्या यशापयशाच्या चर्चा गाजतात. त्यात कित्येकदा ती खचून जाते. ही बाब मला पटत नाही. मला या क्षेत्रात काम करायचंय आणि माझा माझ्या कामावर विश्वास आहे.
नाटकाविषयीचे प्रेम कायम- सिद्धार्थ गुप्ता
दुबईत चांगल्या पगाराची नोकरी करत होतो पण, तरीही अभिनय क्षेत्र मला खुणावत होतं. शेवटी व्हायचं ते झालं. ज्या क्षणी मला कामावरून काढून टाकलं त्या क्षणी ठरवलं की, या क्षेत्रात नशीब आजमावयचं. तेव्हा पहिला दरवाजा ठोठावला तो नाटकांचा. एकता कपूरने मला या चित्रपटासाठी विचारले ते पण माझे नाटकातील काम पाहूनच. नाटक आणि चित्रपटातील कलाकारांमध्ये अनेक गैरसमज असतात. या दोन्ही ठिकाणी काम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. नाटकात तुम्हाला भूमिकेत शिरायला, संवाद समजून, आत्मसात करून म्हणायला संधी मिळते. चित्रपटात सर्व प्रक्रिया भराभर होत असतात. त्यामुळे तुम्हाला भूमिका जगायची संधी मिळत नाही. पण, आजही रंगभूमी मला खुणावते आहे. ही दोन्ही भिन्न माध्यमे आहेत आणि माझ्या मते तुम्ही कलाकार असाल तर माध्यमांचा फरक तुम्हाला फार कमी जाणवतो. या चित्रपटाबरोबरच मी ‘होली’ या माझ्या नाटकालाही तितकाच वेळ देतोय.
‘स्टार किड्स’ची भीती कधी नाही. – आशीष जुनेजा
मला अभिनेता व्हायचयं हे ठरवूनच मी या क्षेत्राकडे वळलो. जाहिराती केल्या मग एका मालिकेतही काम केले. पण, नंतर माझी हाव वाढली. पहिल्या मालिकेनंतर चांगल्या कामासाठी मी अनेक मालिकांच्या ऑफर्स झिडकारल्या त्यामुळे जेव्हा मी मालिका करायच्या हे परत ठरवलं तेव्हा मालिकांनी माझ्याकडे पाठ फिरवली. पण, आज वाटतं ते एका अर्थाने बरं झालं. कारण, नाही तर मी या चित्रपटात नसतो. माझा पहिला चित्रपट आणि तो पण एकता कपूरची निर्मिती आहे म्हटल्यावर कित्येकांनी मी साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. सध्या रोज नव्याने येणाऱ्या कलाकारांच्या मुलांमध्ये माझा निभाव कसा लागेल हेपण मला विचारले गेले. पण मला त्यांची भीती कधी वाटलीच नाही. रणबीर कपूर, वरुण धवनसारखे कलाकार आज आपल्या कलागुणांमुळे जागा टिकवून आहेत, खानदानामुळे नाही. आणि याच शिदोरीवर मी ही या क्षेत्रात टिकून राहीन, यावर माझा विश्वास आहे.

Story img Loader