बॉलिवूडचा उगवता तारा सिद्धार्थ मल्होत्रा कतरिना कैफबरोबरच्या आगामी चित्रपटात काम करण्यासाठी कमालीचा उत्सुक आहे. ही एक हलकी-फुलकी पण अनोखी प्रेम कहाणी असल्याचे सिद्धार्थने म्हटले आहे. ‘कल जिसने देखा’ नावाच्या या चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण युकेमध्ये करण्यात येणार असून, या आठवड्यात शुटिंगला सुरूवात होईल. सिध्दार्थ आणि कतरिना पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. त्यांच्या असलेल्या वयापेक्षा वेगळ्या वयाची भूमिका साकारण्याची संधी दोघांना मिळाल्याचे ‘पीटीआय’शी बोलताना सिद्धार्थने सांगितले. ‘ब्रदर्स’सारख्या यशस्वी अॅक्शनपटात काम केल्यानंतर प्रेमकथेवर आधारित आगामी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने सिद्धार्थ आनंदीत आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी तयारी करत असून, अनेक दिवसांपासून आम्ही सराव करत असल्याचे सांगत, कतरिनाबरोबर मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी आपण फार उत्सुक असल्याचे तो म्हणाला. हलकीफुलकी प्रेम कहाणी असलेल्या या चित्रपट काम करताना नक्कीच मजा येणार असल्याचा विश्वासदेखील त्याने व्यक्त केला.

Story img Loader