मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम सादरीकरणांचा गौरव करण्यासाठी फिल्मफेअरतर्फे प्लॅनेट मराठी या शीर्षक प्रायोजकाच्या सहयोगाने ३१ मार्च २०२२ रोजी फिल्मफेअर पुरस्कार मराठीच्या ६ व्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीचा कार्यक्रम मुंबईतील वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. २०२०-२०२१ या कालावधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार असल्याने याचा रोमांच दुप्पट झाला आहे. भारतातील एका सर्वात जुन्या चित्रपटसृष्टीतर्फे सादर करण्यात आलेल्या सर्वोत्तम कलाकृतींचा गौरव कलाकारांच्या मांदियाळीमध्ये करण्यात येणार आहे.
या सोहळ्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार रेड कार्पेटवर शानदार प्रवेश करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव करणार असून कित्येक पिढ्यांवर आपल्या आवाजाने गारुड केलेल्या लता मंगेशकर यांना पूजा सावंत आणि मानसी नायक या अभिनेत्री मानवंदना देणार आहेत. गाण्याचा वैभवशाली वारसा मागे ठेवलेल्या आणि अमर गाण्यांच्या रुपाने आजही सर्वांच्या मनात वसलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील निवडक लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण या दोन स्टार गायिका करतील. त्याचप्रमाणे मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, वैभव तत्ववादी हे आपल्या कौशल्याने मनोरंजनाचा मापदंड एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातील, तसेच अष्टपैलू अमृता खानविलकरचा खास परफॉरमन्स या सोहळ्यात असणार आहे.
आणखी वाचा- लवकरच बंद होणार ‘द कपिल शर्मा शो’? काही दिवसांपूर्वीच सापडला होता वादाच्या भोवऱ्यात
या आगामी पुरस्कारसोहळ्याबद्दल वर्ल्डवाइड मीडियाचे सीईओ श्री. दीपक लांबा म्हणाले, “फिल्मफेअरने मराठी चित्रपटसृष्टीचा अनेक दशकांचा चढता आलेख अनुभवला आहे. मराठी चित्रपटाने कायमच उत्तम कथानकांसह चोखंदळ सिनेप्रेमींना आकर्षित केले आहे. या प्रवासाचा आम्ही एक भाग राहिलो आहोत. आम्ही, फिल्मफेअर पुरस्कार मराठीच्या माध्यमातून या गुणवंत चित्रपटसृष्टीचा आणि असामान्य चित्रकृतींचा गौरव केला आहे. या शानदार पुरस्कार सोहळ्यासाठी प्लॅनेट मराठीसोबत भागीदार केल्याचा आम्हाला आनंद आहे. या चित्रपटसृष्टीने घडविलेल्या कलाकृती पाहून आणि त्यांच्या आवडत्या कलाकारांची सादरीकरणे पाहून मराठी चित्रपटचाहते खुश होतील.”
पुरस्कार सोहळ्याबद्दल मनोगत व्यक्त करताना फिल्मफेअरचे संपादक श्री. जितेश पिल्लई म्हणाले, “मराठी सिनेमा हा भारताच्या मनोरंजन उद्योगक्षेत्राचा एक अविभाज्य घटक आहे. या चित्रपटसृष्टीद्वारे वर्षागणिक उत्तमोत्तम चित्रपट सादर करण्यात येतात. आयकॉनिक ब्लॅक लेडी हे भारतात सिनेकौशल्यातील सर्वोत्तमाचे प्रतीक आहे आणि आगामी सोहळ्यात तिच्या वैभवाला अजून झळाळी आणण्यास आम्ही उत्सुक आहोत. एक नव्हे तर दोन वर्षांतील मराठी चित्रपटांचा गौरव करताना आम्हाला अभिमान वाटत असून दीर्घकाळ स्मृतीत राहणारा एक संस्मरणीय मनोरंजक कार्यक्रम सादर करू शकू, अशी आम्हाला आशा आहे.”
आणखी वाचा- शरद पवारांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मराठी सिनेमाचा गौरव करण्यासाठी सोहळा आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम फिल्मफेअरचे अभिनंदन करते. गेली अनेक वर्षे फिल्मफेअर पुरस्कार मराठीने ही हवीहवीशी वाटणारी ब्लॅक लेडी मिळविण्यासाठी कलाकारांना आपले कौशल्य उंचावण्यासाठी प्रेरणा दिली. ज्या चित्रपटसृष्टीने जागतिक नकाशावर ठसा उमटवला आहे, अशा चित्रपटसृष्टीचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या लोकप्रिय व भव्य सोहळ्याचा भाग झाल्याने मी रोमांचित झाले आहे.”