अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक महेश मांजरेकर हे नाव मराठीसह हिंदी सिनेसृष्टीसाठी काही नवीन नाही. महेश मांजरेकर यांनी अभिनय आणि दिग्दर्शनाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट साकारण्याकडे त्यांचा विशेष कल असतो. आशय, विषय आणि सादरीकरण यात ते नेहमी वैविध्य राखत असतात. आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर महेश मांजरेकर यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकतंच त्यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय दत्तच्या ‘वास्तव’ या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाद्वारे महेश मांजरेकर यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी ‘आई’, ‘दे धक्का’, ‘पु. ल. देशपांडे’, ‘नटसम्राट’, ‘लालबाग परळ’, ‘वरणभात लोन्चा’ यासारख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यासोबतच सलमान खानच्या ‘वांटेड’, ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’ अशा अनेक चित्रपटातही त्यांनी अभिनेता म्हणून विविध भूमिका साकारल्या. महेश मांजरेकर यांचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी मेजवानीच असतो. यानुसार महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधत एका नव्या चित्रपटाची महाघोषणा केली आहे.

“दिघे साहेबांचे गुण दाखवण्यासाठी एक चित्रपट अपुरा, दुसऱ्या भागाची तयारी सुरु”; प्रसाद ओकने दिली माहिती

महेश मांजरेकर यांनी काल त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी महाराष्ट्राचा नकाशा असलेला एक फोटो शेअर केला होता. त्यावर त्यांनी १ मे महाराष्ट्र दिनी महाघोषणा असे लिहिले होते. त्यात त्यांनी सकाळी १० वाजता ही महाघोषणा होईल, असेही सांगितले होते. नुकतंच त्यांनी ही महाघोषणा केली आहे.

Chandramukhi box office collection : ‘चंद्रमुखी’तील चंद्रा आणि दौलतरावची प्रेक्षकांना भुरळ, पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

महेश मांजरेकरांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या आगामी चित्रपटाचे एक पोस्टर जाहीर केले आहे. ‘वीर दौडले सात’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. यासोबत त्यांनी याला हटके कॅप्शनही दिली आहे. “इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा, मोठ्या पडद्यावर साकारणार, न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम, मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती…वीर दौडले सात, दिवाळी २०२३”, असे त्यांनी यात म्हटले आहे.

विशेष म्हणजे महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे पोस्टर हिंदीतही शेअर केले आहे. ‘वो सात’ (wo saat) असे हिंदी भाषेतील पोस्टरला नाव देण्यात आले आहे. त्यांचा हा चित्रपट एकाचवेळी दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शिवाजी महाराजांची गाथा सर्वत्र पोहोचवी, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक बजेटचा चित्रपट असणार आहे. विशेष म्हणजे सध्या छत्रपती शिवरायांवर निर्मिती होत असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये या चित्रपटाचीही भर पडणार आहे. या आधी महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Filmmaker mahesh manjrekar upcoming movie veer daudale saat marathi big budget nrp