एस एस राजामौली यांचा ‘आरआरआर’ या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळालं नसलं तरी या चित्रपटाने जगभरात भारतीय चित्रपटाचं नाव मोठं केलं आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाची संपूर्ण टीम याच्या प्रमोशनसाठी जपानमध्ये गेली होती. तिथल्या प्रेक्षकांनीही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला आहे. जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा ‘आरआरआर’ हा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे.
‘बाहुबली’च्या घवघवीत यशानंतर या चित्रपटामुळे राजामौली यांच्याकडून प्रेक्षकांच्या आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवावं असं प्रत्येकाला वाटत होतं. पण एका गुजराती चित्रपटाला पाठवल्याने बऱ्याच लोकांचा भ्रमनिरास झाला. ‘आरआरआर’ अल्लूरी सीतारमन राजू आणि कोमराम भीम या तेलुगू स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यावर बेतलेला चित्रपट आहे.
आणखी वाचा : समांथाचा ‘यशोदा’ अमिताभ बच्चन यांच्या ‘उंचाई’वर पडला भारी; बॉक्स ऑफिसवर करतोय जबरदस्त कमाई
‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार नुकतंच एका मुलाखतीदरम्यान राजामौली यांनी ‘आरआरआर २’बद्दल खुलासा केला आहे. याबद्दल बोलताना त्यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची शक्यता वर्तवली आहे. राजामौली म्हणाले, “माझ्या सगळ्या चित्रपटांची कथा माझे वडील लिहितात. आम्ही ‘आरआरआर २’बद्दल काही गोष्टींविषयी चर्चा केली आहे, ते सध्या त्या कथेवर काम करत आहेत.”
यावरूनच या चित्रपटाचा दुसऱ्या भाग येऊ शकतो अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. शिवाय ‘आरआरआर’ या चित्रपटाचं सादरीकरण ‘इफ्फी’मध्येदेखील केलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात पार पडणार आहे.