पूर्वी सुधीर मिश्रा यांना सहायक म्हणून काम करणाऱ्या दिग्दर्शक अनुराग कश्यपबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत. अनुरागकडून आपल्याला प्रेरणा मिळते, असे मत सुधीर मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.
मुंबईतील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आज हिंदी चित्रपटसृष्टीत जे विषय हाताळले जात आहेत, ते पाहता काही तरूण दिग्दर्शकांकडूनही आपल्याला प्रेरणा मिळते. पूर्वी अनुराग कश्यप याने माझ्याकडे सहायक म्हणून काम केले होते. आज त्याच्याकडून मला प्रेरणा मिळते. त्याचा ‘बॉम्बे वेल्वेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला असला, तरी मला तो आवडला. तुम्हाला एखादा दिग्दर्शक आवडला की त्याचे चित्रपट तुम्हाला आवडू लागतात. त्याची कथा मांडण्याची पद्धतही तुम्हाला आवडू लागते. आयुष्यात चढ-उतार येतच असतात. प्रत्येकजण प्रत्येकवेळी यशस्वी होतोच, असे नाही.
चित्रपटांमध्ये अजून चांगले काही करण्याचा अनुरागचा प्रयत्न असतो. मला तो आवडतो. त्याचा ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ही मला आवडला होता, असे त्यांनी सांगितले.